थर्टी फर्स्ट अन नववर्षाच्या स्वागतासाठी १३ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज
By मनीषा म्हात्रे | Published: December 29, 2023 07:32 PM2023-12-29T19:32:02+5:302023-12-29T19:32:55+5:30
मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरु असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहे. मुंबईतील ...
मुंबई: थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरु असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईपोलिसही सज्ज आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर १३ हजार ५०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि शीघ्रकृती दलाचे जवान दिमतीला असणार आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलाकडून २२ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २०५१ पोलीस अधिकारी व ११ हजार ५०० पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांचेसोबत महत्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, शीघ्रकृतीदल, गृहरक्षक दल बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत. होमगार्डस् अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या ४६ तुकड्या व १५ शीघ्रकृती दलाच्या तुकड्या तसेच दंगल नियंत्रण दलाच्याही तीन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित पकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे. शहरातील विविध रेल्वे स्थानके, समुद्रकिनारी, महत्त्वाची मंदिरे,गर्दीच्या ठिकाणे तसेच संवेदनशील भागात साध्या वेशातील पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे.
३० डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बॅण्डस्टॅन्ड, जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार असून किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलीस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत.
निर्भयाचा वॉच
या जल्लोषात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्भया पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. मद्याच्या नशेत महिलांची छेडछाड केली जाते अथवा विनयभंगसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. असे प्रकार घडू नयेत यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत.
तर थेट कोठडी
मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या हाती लागल्यास थेट कोठडीची हवा खावी लागणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत अशा टवाळखोर तसेच मद्यपी चालकांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
पार्ट्या रडारवर
यादरम्यान ड्रग्ज तसेच विविध पार्ट्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे.