मुंबई : कांदिवलीतील एका शाळेत प्रायमरीमध्ये शिकणाऱ्या ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने तिला पेन किलर देऊन घरी पाठवले, असा खळबळजनक आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी त्याच्यासोबत शाळा प्रशासनही याला जबाबदार असून, त्यांना कारागृहात डांबा, आरोपी सुरक्षारक्षकाला फासावर लटकवा, अशा मागण्या करत संतप्त पालकांनी सोमवारी शाळेसमाेर पोलिसांना घेराव घातला.
पीडित मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती. ती घरी परतली तेव्हा ती शांत होती. मात्र, तिच्या आईने तिला टॉयलेटला जाण्यास सांगितल्यावर तिने वेदना होत असल्याचे सांगत रडायला सुरुवात केली. आईला संशय आल्याने मुलीला विश्वासात घेत विचारले असता तिने घडलेला प्रसंग सांगितला ते ऐकुन तिला धक्का बसला. तिने पतीला फोन करून घरी बोलावले आणि घाबरलेले पालक लेकीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेव्हा तिथल्या डॉक्टरने तिला शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. शताब्दी रुग्णालयात मुलीला डॉक्टरने तपासले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले.
एक काला आदमी, अशी तिने त्याची ओळख सांगितली. याविरोधात समतानगर पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपी व या घटनेची माहिती लपणाऱ्यांवर समतानगर पोलिसांनी पोक्सो कलम २१ आणि भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(I) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पीडित मुलीवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित मुलीला सुरक्षारक्षकाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे.
शिक्षिकेने पुरावे मिटवल्याचा आरोप :
मुलीसोबत आरोपी स्वच्छतागृहात होता. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका शिक्षिकेने दरवाजा ठोठावत मुलीला बाहेर काढून आरोपीला आतच लॉक केले. दुसऱ्या शिक्षिकेने मुलीची पडताळणी करत तिला स्वच्छ धुऊन दुसरे कपडे घातले. जो पुरावे मिटवण्याचा प्रयत्न होता. मुलीला पेन किलर देत तसेच हातावर स्टार देऊन रिंगा रिंगा रोजेस खेळत तिला खुश करायचा प्रयत्न केला.
शाळा, वकिलाकडून धमकीचा आरोप :
शाळेने आम्हाला फोन केला नाही. तसेच, आम्ही शनिवारी या घटनेबाबत जाब विचारायला शाळेत गेल्यावर प्रशासनाने १०० या क्रमांकावर फोन करत पोलिसांना बोलावले. तसेच, एका वकिलाकडून आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला कामावरून काढले आता तुम्ही आणि तो बघून घ्या, आमचा काही संबंध नाही असेही उत्तर देत बाहेर हाकलल्याचे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.