मुंबई-
कांदिवली पूर्व येथील समता नगर (हायवे वरील) अटलबिहारी वाजपेयी सेंटर ऑफ एक्सिलेन्स येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १२ फूट ऊंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दि, २५ डिसेंबर २०२१ रोजी अटलजींच्या जयंतीदिनी होणार होते. कार्यक्रमाची सर्व तयारी देखिल झाली होती. मात्र राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना दि,२४ डिसेंबर रोजी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्याची परवानगी आदल्या दिवशी दि,२४ डिसेंबर रोजी नाकारली होती.
त्यामुळे अद्याप हा पुतळा दहिसर चेक नाका येथे एका खाजगी जागेत आहे. तो येत्या रविवार दि, २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रथावर आरूढ करून रथयात्रेद्वारे कांदिवली पूर्व येथे जल्लोषात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. लोकमतने सातत्याने सदर विषय मांडला आहे.
सदर पुतळा कांदिवली येथे आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलिसांनाही आम्ही कळविले आहे. दहिसर चेक नाका येथून येत्या रविवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा रथातून सदर जागेत शक्तिप्रदर्शन करत आणला जाणार आहे. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सोबत उत्तर मुंबईतील सर्व आमदार, नगरसेवक, भाजप नेते, पदाधिकारी आणि राष्ट्र भक्त नागरिक असतील. कांदिवली येथे पुतळा आणल्यानंतर त्याचे अनावरण करणार नाही.जो पर्यंत राज्य सरकारमधील क्रीडा मंत्री सुनील केदार परवानगी देणार नाही तोपर्यंत पुतळ्याचे अनावरण करणार नाही. परवानगी मिळाल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन जल्लोषात अनावरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अनुकूलता दाखवली आहे.परंतू राजकारण करत क्रीडा मंत्री सुनील केदार हेच पुतळा उभारण्यासाठी परवानगी देत नसल्याची टीका खा. शेट्टी यांनी केली.