ब्रिजला गॅप, डोक्याला ताप, पाेलिसांना फाेन आला आणि वाहतुकीचा बाेजवारा उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:38 AM2022-09-15T06:38:05+5:302022-09-15T06:38:22+5:30

साहेब, केम्प्स कॉर्नर पुलाला गॅप दिसतोय, तो कोसळू शकतो...  

A gap is visible at Kemps Corner Bridge. It can collapse, police got a phone call | ब्रिजला गॅप, डोक्याला ताप, पाेलिसांना फाेन आला आणि वाहतुकीचा बाेजवारा उडाला

ब्रिजला गॅप, डोक्याला ताप, पाेलिसांना फाेन आला आणि वाहतुकीचा बाेजवारा उडाला

googlenewsNext

मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘साहेब, केम्प्स कॉर्नर पुलाला गॅप दिसतोय. तो कोसळू शकतो...’ पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या या कॉलने खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक बंद करून दुसऱ्या दिशेने वळवली. नेमके काय झाले? या विचारात चालकही गोंधळले. ५७ वर्षे जुना पूल अचानक बंद झाल्यामुळे  नानाविध अफवांनी जोर धरला. पोलिसांसह नागरिकांमध्ये धाकधूक, चिंता वाढली. अखेर, पाऊण तासाच्या कठोर तपासणीनंतर पालिका अभियंत्यांनी तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. 

गावदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने कॉल करून केम्प्स कॉर्नर पुलाला गॅप दिसत असल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षातून याबाबत माहिती मिळताच गावदेवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी, वाहतूक थांबवून चालकांना ऑगस्ट क्रांती मैदान - हाजीअली-  विल्सन कॉलेज - नाना चौकमार्गे वाहतूक वळवली. पालिका अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी सुरू केली. 

२०१८ मध्येही अफवा आणि तणाव
२०१८ मध्येही केम्प्स कॉर्नर पुलाचा फोटो व्हायरल करत तो तुटल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, तपासणीत पुलाचे आर्किटेक्ट शिरीष बी. पटेल यांनी स्पष्टीकरण देताना पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. कंत्राटदाराने त्यावेळी तो पूल आर्किटेक्टच्या रचनेप्रमाणे बांधला नसल्याने तो पुन्हा बांधावा, अशी मागणी केली होती. मात्र, पालिकेने पूल बांधला होता. तसेच पालिकेला उद्घाटनाची घाई होती. त्यात काहीही धोकादायक नसल्याने पालिकेने नव्याने पूल बांधण्यास नकार दिला होता.

नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक थांबवून कारवाई करण्यात आली. पालिका अभियंत्यांकडून पूल सुरक्षित असल्याचे सांगताच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. जूनमध्येच या पुलाचे ऑडिटही झाले असून, पूल सुरक्षित आहे. - नीलोत्पल, पोलीस उपायुक्त 

Web Title: A gap is visible at Kemps Corner Bridge. It can collapse, police got a phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.