Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:36 AM2022-10-10T07:36:53+5:302022-10-10T07:38:26+5:30

शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे नावाचा गारदी, शिवसेना संपणार नाही! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

A gardi named Eknath Shinde... 40 Bhamtas MLA became Delhi's slaves, Shiv Sena narrated in Thackeray style for shindr group | Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजकीय सामन्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले आहे. तसेच, केवळ शिवसेना हे नावही वापरण्यास आयोगाने दोन्ही गटाला बंदी घातली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपसह सरकार स्थापन केले. त्यानंतर, मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक टोकाला गेला. मात्र, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवल्यामुळे ठाकरेंचा राग अनावर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गारदी संबोधत शिवसेना संपणार नाही, असे शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले आहे. 

शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे नावाचा गारदी, शिवसेना संपणार नाही! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यामध्ये, एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टिकेचे जबरी वार केले आहेत. तसेच, भाजपवरही निशाणा साधला असून कुणीही काहीही केलं तरी शिवसेना संपणार नाही, पुन्हे झेपावेल, असे सांगत ठाकरी बाणा दाखवून दिला. ''कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल , झेपावेल , उसळेल , दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल . निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ' धनुष्यबाण ' हे चिन्ह गोठवले आणि ' शिवसेना ' हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला . दिल्लीने हे पाप केले . बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली ! आम्ही शेवटी इतकेच सांगतो , कितीही संकटे येऊ द्या , त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच !, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे दिल्लीचे गुलाम झाले

बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली. शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल

महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधार

महाराष्ट्रावर विजेचा लोळ कोसळावा आणि सर्व काही क्षणात नष्ट व्हावे, असा क्रूर निर्णय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिला आहे. गद्दार मिंधे गटाने आक्षेप घेतला म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचे नामोनिशाण खतम करण्याचा अघोरी प्रकार झाला आहे. निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले आहे आणि 'शिवसेना' हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही काढला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय देऊन महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधकार निर्माण केला. 

शिंदेंइतकाच पाकिस्तानही खुश असेल

महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेले 105 हुतात्मे, शिवसेनेसाठी मरण पत्करलेले असंख्य त्यागी वीरपुरुष आकाशातून या गारद्यास शाप आणि शापच देत असतील. निवडणूक आयोगाने शिवसेनेवर घातलेल्या 'गारदी' घावाने शिंदेंइतकाच पाकिस्तान खूश असेल. महाराष्ट्राचा प्रत्येक दुष्मन आनंदी असेल. मात्र स्वतःच्या आयुष्याचे शिंपण करून 'शिवसेना' नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज ज्या वेदना, दुःख होत असेल त्याचे काय? हे पाप ज्यांनी केले आहे ते शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल.

नरकातही जागा मिळणार नाही

महाराष्ट्रावरचा प्रत्येक घाव शिवसेनेने आपल्या छातीवर झेलला. हजारो शिवसैनिकांनी त्यासाठी बलिदाने दिली, रक्त सांडले. त्या रक्त आणि त्यागातून
बहरलेल्या शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारीत विकट हास्य केले असेल. शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही!

Web Title: A gardi named Eknath Shinde... 40 Bhamtas MLA became Delhi's slaves, Shiv Sena narrated in Thackeray style for shindr group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.