एक गर्डर ; २७ मीटर लांब, १५७ मेट्रिक टन वजनाचा; मोनोवरून धावणार मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:02 PM2023-08-20T15:02:46+5:302023-08-20T15:03:57+5:30
विशेष म्हणजे हे गर्डर मोनोरेलच्या स्ट्रक्चरवर बसविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एमएमआरडीएच्या वतीने मेट्रो २ ब चे कामही वेगाने सुरू असून, शुक्रवारी रात्री चेंबूर येथील व्ही.एन.पूरव मार्गावर चेंबूर नाका येथे दोन गर्डर यशस्विरीत्या बसविण्यात आले. यातील एका स्पॅनची लांबी २७ मीटर तर वजन १५७ मेट्रिक टन आहे. विशेष म्हणजे हे गर्डर मोनोरेलच्या स्ट्रक्चरवर बसविण्यात आले आहेत. मोनोरेलची टीम आणि एमएमआरडीएच्या टीमने एकत्र येत शनिवारी पहाटे ५ वाजता हे काम फत्ते केले. गर्डर बसविण्यासाठी महाकाय अशा क्रेनचा वापर करण्यात आला. १८ मीटरवर हे गर्डर उचलण्यात आले आणि त्याची मांडणी करण्यात आली असून, आता येथून धावणाऱ्या मोनोरेलवरून मार्गी लागणारी मेट्रो २ ब धावणार आहे.
मेट्रो २ ब कोणाला जोडणार ?
कुर्ला रेल्वेस्थानकाशी जोडला जाईल.
मानखुर्द रेल्वे स्थानकाशी हा मार्ग कनेक्ट असणार.
मोनोरेलच्या चेंबूर स्थानकाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी असेल.
डी. एन. नगर येथे मेट्रो मार्ग १ सोबत मेट्रो २ ब हा मार्ग जोडला आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गाशी मेट्रो २ ब वांद्रे येथील जंक्शनवर जोडली जाईल.
वडाळा ते ते कासारवडवली (ठाणे) दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ४ सोबत कुर्ला येथे मेट्रो २ ब जोडली जाईल.