लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीची घरवापसी, कुटुबीयांनी केली विधीवत पूजा
By मनोहर कुंभेजकर | Published: July 17, 2023 03:52 PM2023-07-17T15:52:06+5:302023-07-17T16:37:13+5:30
मनसेच्या पुढाकारातून लव्ह जिहादच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या मुलीची विधीवत पूजा करून पुन्हा हिंदू धर्मात धर्मांतर करण्यात आले.
मुंबई : फेसबुकच्या माध्यमातून ओळख केलेल्या आणि नंतर जबरदस्तीने लग्न करून इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यास भाग पाडलेल्या मुलीची अखेर एक वर्षांनंतर सुटका होऊन ती सुखरूप घरी परतली.
मनसेच्या पुढाकारातून लव्ह जिहादच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या मुलीची विधीवत पूजा करून पुन्हा हिंदू धर्मात धर्मांतर करण्यात आले. दादर येथील कालिकामाता मंदिरात मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्या मुलीची ब्राम्हणाकडून विधिवत पूजा करण्यात आली.
फेसबुकच्या माध्यमातून जानेवारी २०२२ मध्ये सदर इसमाशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. एके दिवशी तो इसम मुंबईत भेटायला आला व माझा वाढदिवस आहे, असे सांगत मला रोहा इथे त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला तिथे केक, बिर्याणी व शीतपेय पिण्यास दिले, अशी माहिती त्या मुलीनी दिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझे अंग दुखत होते. त्यावेळेस मी त्याला मुंबईला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात सोडण्यास सांगितले.
तीन दिवसांनी तो मला माझ्या मुंबईतील घरी भेटण्यास आला आणि मोबाईलवर नग्न अवस्थेत काढलेले फोटो दाखवून ते व्हायरल करीन अशी धमकी देत शरीर संबधाची मागणी केली. त्यानंतर जून महिन्यात लग्न केले आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी काझीकडे नेऊन १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करून घेतल्याचे तिने सांगितले.
महिन्याभरच्या कालावधीनंतर त्याने कुवेतला जाऊन मुस्लिम मुलीशी दुसरा विवाह केला. दरम्यानच्या काळात मला त्याच्या घरच्याकडून खूप साऱ्या छळाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मी रोहा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली व दोन दिवसांकरीत मुंबईला जाते, असे सांगत थेट मुंबई गाठली असे तिने सांगितले.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे हिंदू धर्मात पुन्हा धर्मांतर करण्यात आले. मात्र लव्ह जिहाद विरोधी कायदा सरकारने काढावा जेणेकरून अशा प्रकारच्या कारवायांना आळा बसू शकेल, असे यशवंत किल्लेदार यांनी 'लोकमत'ला सांगितले.