मुंबईत लालबागच्या राजाचे आगमन झाले आहे. याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो लोक गर्दी करत असतात. या गणेशभक्तांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. यंदा लालबागच्या राजाला सोन्याचा मुकूट घालण्यात आला आहे.
हा सोन्याचा मुकूट दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिला नसून अनंत अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनने दिला आहे. या मुकूटाची खासीयत म्हणजे त्याचे वजन २० किलो एवढे असणार आहे. तर याची किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनविण्यासाठी कारागिरांना दोन महिने लागले आहेत. लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी आज प्रथम दर्शन सोहळा सुरु होण्यापूर्वी याची माहिती दिली आहे.
अनंत अंबानी गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. तसंच अनंत अंबानी गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थितीत लावताना आपण पाहिलं आहे. यासोबतच राजाच्या विसर्जनावेळीही ते गिरगाव चौपाटीवर उपस्थित असतात. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडळाला विविध आरोग्य विषयक उपक्रमांसाठीही अंबानी कुटुंबीयांच्या वतीनं मदत केली गेली आहे.
कोविड काळात लालबागचा राजा मंडळाकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामांसाठीच्या निधीची चणचण मंडळाला भासू लागली होती. त्यावेळी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेऊन मंडळाला मोठी मदत केली होती. मंडळाच्या रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने २४ डायलिसीस मशीन्स दिल्या होत्या. लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकारणीमध्ये उद्योजक अनंत अंबानी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.