मुंबईत उद्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 04:56 PM2023-12-05T16:56:17+5:302023-12-05T16:56:53+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी येतात. यादिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं यासाठी मुंबई शहर, उपनगर परिसरात सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली होती. आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. हे आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुटी मिळावी, अशी मागणी केली होती.