लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी विरोधातील आणि महाराष्ट्राला लुटून खाणारे आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारचा चहा घेणे म्हणजे लोकशाहीचा, तसेच जनतेचा अपमान असल्याची जळजळीत टीका करीत विरोधी पक्षाने बुधवारी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षाला देण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षाने पत्रकार परिषदेत सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, सपाचे अबू आझमी, आदी यावेळी उपस्थित होते.
सरकार टेंडरबाज : वडेट्टीवार वडेट्टीवार यांनी सरकारवर कमिशनखोर, टेंडरबाज असल्याचा आरोप केला. या सरकारमधील कमिशनखोरी ३० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. सगळ्या मंत्र्यांकडे दलालांची फौज आहे. या दलालांना मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र कक्ष देण्यात आला आहे. या कक्षात बसून सर्रास तोडपाणी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
सरकारच्या निरोपाचे अधिवेशन : उद्धव ठाकरे
- विधिमंडळाचे गुरुवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे सरकारच्या निरोपाचे अधिवेशन असेल, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पदवीधर निवडणूक मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
- ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षाला संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपने केला. भाजपविरोधी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला.
- देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही, असा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.