Join us  

अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक

By मनोहर कुंभेजकर | Published: September 11, 2022 6:44 PM

अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार आहे. 

मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. यंदा मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने आणि कोविड नंतर दोन वर्षांनी निघणारी येथील मिरवणूक जल्लोषात निघणार असून हजारो गणेश भक्त यात सामील होणार आहे. जोपर्यंत अंधेरीच्या राजाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत अंधेरीचा गणेशोत्सव संपत नाही. तसेच अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावरच अंधेरीकर संकष्टीचा उपवास सोडतात अशी अंधेरीकरांची दृढ श्रद्धा आहे.

दरवर्षी आकर्षक देखावे येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती साकार करते. यंदा गुजरात वडोदरा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये (श्रीमंत गायकवाड यांचा राजवाडा) अंधेरीचा राजा विराजमान झाला आहे. आझादनगर मेट्रो रेल्वे स्थानकपासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला तब्बल कोविड नंतर दोन वर्षांनी अनेक सेलिब्रेटिंसह गणेश भक्तांनी यंदा मोठी गर्दी केली असून त्यांच्या लांबच लांब रांगा आझादनगर परिसरात लागल्या असल्याचे येथील चित्र आहे.

यंदा मंगळवार दि,१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंगारक संकष्टी चतुर्थीला अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. तर बुधवार दि,१४ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास १८ तासांच्या मिरवणुकी नंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन होईल. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रक वर आझाद नगर २ येथून अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल. त्यानंतर आझाद नगर,अंबोली,अंधेरी मार्केट,एस.व्ही.रोड,जयप्रकाश रोड वरून राजकूमार,अपनाबाजार,चार बंगला,पिकनिक कॉटेज,मछलीमार,गंगाभवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी दुसऱ्या दिवशी पोहचेल.तेथे येथील माजी नगरसेवक दिवंगत मोतीराम भावे यांच्या कुटुंबांनी अंधेरीच्या राजाची पूजा केल्यावर दुपारी २ च्या सुमारास १८ तासांच्या मिरवणुकी नंतर अंधेरीच्या राजाचे विसर्जन होईल.

आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदशक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी लोकमतला दिली. वेसावे गावातील मांडवी गल्ली कोळी जमातीचे कार्यकर्ते वेसाव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे खास बोटीतून विसर्जन करून अंधेरीच्या राजाला निरोप देतील अशी माहिती फणसे यांनी  दिली.

दरवर्षी संकष्टीला होते विसर्जनसन १९७३ साली आझाद नगर मध्ये राहात असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल,टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते.आमचे कारखाने परत लवकर सुरू होवू दे,आम्ही अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन करू असा नवस त्यांनी अंधेरीच्या राजाला केला होता.आणि बंद असलेले सदर कारखाने व कामगारांची रोजीरोटी परत सुरू झाली. त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सचिव विजय सावंत यांनी दिली.

 

टॅग्स :मुंबईअंधेरीगणेशोत्सव