राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी बाणगंगा तलाव येथे भव्य दीपोत्सव, महाआरतीही होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:07 PM2023-12-28T16:07:58+5:302023-12-28T16:09:31+5:30
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने होणार कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई: समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक, सांस्कृतीक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदु असलेल्या अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील वाळकेश्वर येथील प्रभु श्रीराम यांच्या चरणांनी पावन झालेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी महापालिकेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात दिपोत्सव साजरा करण्याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांची योजना आखण्यात आली आहे. या अंतर्गत बाणगंगा तलाव येथे २२ जानेवारी २०२४ रोजी दीपोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा दीपोत्सव सर्व मुंबईकरांसाठी खुला असणार आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याचदिवशी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असून, प्रसाद वाटप देखील होणार आहे.
मंत्री लोढा यांच्या पुढाकाराने आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ५ ते १५ जानेवारीच्या दरम्यान शाळकरी मुलांसाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धा अशा स्पर्धा होणार असून १ ली ते ५ वी प्राथमिक गट आणि ६ वी ते १० माध्यमिक गट अशी विभागणी करण्यात आलेली आहे.