मनोहर कुंभेजकर
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील मुंबई महानगर पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात उद्यानाच्या दर्शनी भागात गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी गुजराती वाद उफाळून आला आहे.
सदर उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक हे गुजराती भाषेत लिहिल्याच्या तक्रारी या कार्यालयास विविध माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे सदर ठिकाणी असलेले गुजराती भाषेतील नामफलक काढून मराठी भाषेत त्वरित करण्यात यावा व सदरबाबतचा अहवाल या कार्यालयास देण्यात यावा असे पत्र आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी पोईसर जिमखान्या च्या व्यवस्थापकाला दिले आहे.
2006 साली स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे उदघाटन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.त्यादिवसांपासून येथील तिन्ही प्रवेशद्वारावर मराठी,इंग्रजी व गुजराती या तिन्ही भाषेत नामकरण करण्यात आले आहे.जवळपास 17-18 वर्षे कोणत्याही वादविवादाशिवाय सदर उद्यान पोईसर जिमखाना तोट्यात चालवत आहे.
यामुळे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी हे कमालीचे संतप्त झाले असून या पत्रातील मजकूर वाचून आपल्याला वेदना झाल्या आहेत. गेल्या 17-18 वर्षात गुजराती नामफलकामुळे कधी ही वाद झाला नाही. किंवा पालिकेनेही अशी नोटीस कधी दिली नव्हती.मग आजच अशाप्रकारची नोटीस देण्याचे कारण काय?असा सवाल त्यांनी केला. कोणतीही शहानिशा न करता,ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी गुजराती वाद सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी निर्माण केला आहे.तेथील मराठी भाषेच्या नामफलकाकडे दुर्लक्ष करून ऐकीव माहितीवर नोटीस काढणे चुकीचे आहे.त्या बेजबाबदार पणे वागत असून बोरीवली आणि उत्तर मुंबईचे वातावरण त्या बिघडवत आहे.त्यामुळे त्यांची येथून उचलबांगडी करा अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडे केली आहे.
याबाबत पोईसर जिमखान्याने आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले असून आपण स्वतः येथे येवून शहानिशा करावी,तिन्ही भाषेत येथे नामफलक लावले असून फक्त मराठी भाषेतील नामफलक ठेवून अन्य भाषेतील नामफलक काढण्यात यावेत की कसे याबाबत आमचे पत्र मिळताच कळवावे,जेणेकरून आम्हांस पुढील कारवाई करण्यात मदत होईल असे या पत्रात नमूद केले आहे.
या उद्यानाचे शिल्पकार खासदार गोपाळ शेट्टी यांनी याबाबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की,लोकवर्गणीतून आणि येथील 14 आदिवासी बांधवांचे स्थलांतर करून 7 एकर जागेवर बोरिवली करांना अभिमान वाटावा असे उद्यान 2006 साली उभारले. गेल्या अनेक वर्षांपासून वीर सावरकर उद्यान हे तोट्यात असून महापालिकेला पत्रव्यवहार करून हा प्रकल्प आपण स्वतः चालवावा.आणि आम्ही खर्च केलेले पैसे आम्हाला उपलब्ध करून द्यावेत यासाठी पत्रव्यवहार केला असून अद्याप कोणताही प्रतिसाद पालिकेने कडून मिळालेला नाही.तरी मन मोठे करून हा प्रकल्प खूप चांगल्या पध्दतीने देखरेख करत आहे.मात्र आपले पत्र वाचून आमच्या संस्थेतील सर्व पदाधिकारी व हितचिंतक हादरले असून गुजराती नामफलक काढण्याचे आदेश नांदेडकर यांनी दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
देशासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत छोट्या गोष्टी नजरे समोर आणून त्यांची प्रतिमा कमी करण्याचे काम अश्या व्यक्ती करतात. त्यामुळे बोरिवली व उत्तर मुंबईचे वातावरण कोणी बिघडवू नये अशी स्पष्ट भूमिका खासदार गोपाळ शेट्टी यांनी मांडली.
याबाबत सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,मी मिटींग मध्ये आहे,मला टेक्स्ट करा असा मेसेज त्यांनी केला.