मुंबई - देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचं स्पीरीट अनेकांना अचंबित करुन जातं. येथील गर्दी, वाहतूक कोंडी, जागेची कमतरता, तरीही दिवसाचे २४ तास धावत असलेली मुंबई म्हणजे संशोधनाचाच विषय म्हणा ना. त्यात, मुंबई पोलीस म्हणजे मुंबईकरांना लाभलेलं वरदानच. दैनंदिन प्रवासात याच लोकलचा मोठा आधार चाकरमान्यांना आहे. मात्र, हा प्रवासही सोप्पा नाही. म्हणूनच आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेचं कौतुक केलंय.
मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी लोकल प्रवासाचा पर्याय निवडला. मात्र, लोकलने प्रवास करतानाही त्यांना कल्याण स्टेशनवर येईपर्यंत अर्धा तासाच्या प्रवासासाठी तीन तास वेळ घालवावा लागला. त्यांच्या या प्रवासाचा अनुभवच त्यांनी कथन केला आहे. तसेच, या प्रवासातील अनुभवावरुन त्यांनी मुंबईकरांच्या सहनशीलतेचं कौतुक केलंय.
सत्यजित तांबेंची पोस्ट
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय. खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे. मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.