रेल्वे प्रवाशावर फेरीवाल्याचा हल्ला; हावडा मेलमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:36 AM2023-03-30T06:36:10+5:302023-03-30T06:36:18+5:30
तक्रारदार अजय सिंह मूळचे झारखंडचे निवासी असून, दोन महिन्यांपासून खारघरमध्ये सुतारकाम करत होते.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १७ वर आलेल्या हावडा मेल गाडीने प्रवास करणाऱ्या अजय सिंह (२०) या रेल्वे प्रवाशावर इअरफोन विकणाऱ्या फेरीवाल्याने दगडाने हल्ला केला. तसेच अजून एका प्रवाशालाही गाडीतून बाहेर फेकण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
तक्रारदार अजय सिंह मूळचे झारखंडचे निवासी असून, दोन महिन्यांपासून खारघरमध्ये सुतारकाम करत होते. २७ मार्चला त्यांचे मूळ गाव बजटो येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर आले. हावडा मेलच्या जनरल बोगीतून ते प्रवास करत होते. गाडी फलाटावरून सुटल्यानंतर एक इअरफोन विक्रेता डब्यात शिरला. त्याच्याकडून सिंह यांच्या शेजारच्या प्रवाशाने १५० रुपयांचा इअरफोन खरेदी केला. विक्रेत्याला त्याने ५०० रूपये दिले.
इअरफोन विक्रेत्याने ३०० रूपये देऊन ५० रूपये नंतर देतो, असे सांगितले. त्यानंतर दुसरा इअरफोन विक्रेता तिथे आला आणि तू कोणाचे पैसे चोरले, असे सिंह यांच्या शेजारच्या प्रवाशाला विचारू लागला. त्यावर सिंहनी इअरफोन खरेदी केल्यानंतर उरलेले ते पैसे असल्याचे त्याला सांगितले. तेव्हा फेरीवाल्याने सिंह आणि शेजारच्या प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच जास्त बोललास तर गाडीच्या बाहेर फेकण्याची धमकीही दिली. तसेच पहिल्या इअरफोन विक्रेत्याने सिंहच्या खिशातले २५०० रूपये काढून घेतले. तसेच सिंहच्या कानावर दगड मारून त्यांना दुखापत करून पळून गेले. सिंह यांनी १०० आणि रेल्वे हेल्पलाईन १५१२ वर तक्रार केल्यावर गाडी रात्री ११.२५ वाजता कल्याण रेल्वे पोलिसांनी सिंहना कल्याणच्या रुक्मिणीबाई मनपा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तर पसार तिघांवर गुन्हा दाखल केला. हल्लेखोर हे २० ते २१ वयोगटातील होते.