मुंबई - कोरोनाने दिलेला घाव विसरून मागील वर्षापासून मराठी नाट्यसृष्टी पुन्हा जोमाने कामाला लागली. एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गगनभरारी घेत मराठी नाट्यकर्मींनी यंदा तब्बल ३१ नवीन नाटके रसिकांच्या सेवेत सादर केली. यात काही जुनी नाटके नवा साज लेऊन सजली. या नाटकांनी रसिकांना पुन्हा नाट्यगृहांमध्ये आणण्याचे काम केले. याचा फायदा नवीन वर्षात येणाऱ्या नवीन नाटकांना नक्कीच होईल.
मागच्या वर्षी ३१ डिसेबरला रंगभूमीवर 'थँक्स डियर' हे नाटक सादर करत २०२२ने रसिकांची रजा घेतली. नव्या नाटकांची नांदी देत २०२३ची पहाट झाली. जानेवारीमध्ये नवीन नाटक आले नसले, तरी १० फेब्रुवारीला 'येतोय तो खातोय' हे नवे नाटक रसिकांसमोर सादर झाले. त्यानंतर 'अशीच आहे चित्ता जोशी', 'बाई वाड्यातून जा', 'नियम व अटी लागू', 'जन्मवारी', 'तू तू मी मी', 'सुमी आणि आम्ही', 'संकर्षण व्हाया स्पृहा' आणि 'डाएट लग्न' हि नाटके पहिल्या सहा महिन्यांत आली.
पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत नवीन नाटकांनी चांगलाच जोर लावला. जुलैपासून डिसेंबरपर्यंत जवळपास १६ नवीन नाटके आली. ज्यात 'ओके हाय एकदम', 'ब्रँड अॅम्बेसेडर', 'चाणक्य', 'जर तरची गोष्ट', 'माझ्या बायकोचा नवरा' (सुरुवातीचे शीर्षक 'किरकोळ नवरे'), 'गजब तिची अदा', 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'राजू बन गया जंटलमन', 'अस्तित्व', 'गालिब', '२१७ पद्मिनी धाम', 'मर्डरवाले कुलकर्णी', 'मेलो भाव खाऊन गेलो', 'बोक्या सातबंडे', 'आपण यांना पाहिलंत का?', 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकांचा समावेश आहे. संतोष पवार दिग्दर्शित 'यदा कदाचित रिटर्न्स' हे नाटक कोरोनापूर्वी रंगभूमीवर आले होते. यंदा ते पुन्हा नव्या संदर्भांसह रसिकांच्या सेवेत दाखल झाले. रंगभूमीवरील यंदाचे एकूणच वातावरण पाहता नाटकांप्रती रसिकांचा ओढा मनात प्रेम वाढला असून, बिग बजेट सिनेमांच्या विकेंडलाही नाट्यगृहांबाहेर 'हाऊसफुल'चा बोर्ड झळकल्याने नाट्यसृष्टीत सकारात्मक वातावरण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.न्यायदेवतेच्या दरबारी 'नथुराम'चा वाद...'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचा वाद यंदा चांगलाच रंगला. शीर्षकाचा मुद्दा निकाली निघाला, पण पुढील प्रकरण न्यायदेवतेच्या दरबारी आहे. एकीकडे शरद पोंक्षेंनी 'मी नथुराम' हे नाटक आणले, तर दुसरीकडे मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी १ डिसेंबरला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचा ८१८वा प्रयोग सादर केला. विनय आपटेंचे बंधू विवेक आपटे यांनी पुर्नदिग्दर्शित केलेल्या या नाटकात सौरभ गोखलेने साकारलेल्या नथुरामचे कौतुक होत आहे.जुनी नाटके नव्या रूपात...यंदा आणखी चार गाजलेली नाटके नव्या संचात आली. यात 'अवघा रंग एकचि झाला' या संगीत नाटकासोबत पु. ल. देशपांडेची 'तुझे आहे तुजपाशी' आणि 'मॅड सखाराम' तसेच राजेश देशपांडे दिग्दर्शित 'करून गेलो गाव'चा समावेश आहे. 'अवघा रंग एकचि झाला'मध्ये प्रमोद पवार यांनी, तर 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये डॅा. गिरीश ओक यांनी लक्ष वेधले. 'करून गेलो गाव'मध्ये भाऊ कदमच्या जोडीला ओमकार भोजने आहे. 'मॅड सखाराम'चे दिग्दर्शन मंगेश सातपुतेने केले आहे.