माझी मालकीण शिफ्ट होतेय, घरचे जुने सामान १० हजारात विकतेय; भामट्याने महिलेला लावला चुना
By गौरी टेंबकर | Published: March 16, 2024 04:47 PM2024-03-16T16:47:02+5:302024-03-16T16:47:54+5:30
हा प्रकार जुहू परिसरात घडला असून याविरोधात महिलेने पोलिसात धाव घेतली आहे.
गौरी टेंबकर,मुंबई: माझी मालकीण दुसऱ्या घरात शिफ्ट होतेय आणि घरातले जुने सर्व सामान अवघ्या दहा हजारात विकतेय असे घरकाम करणाऱ्या एका महिलेला सांगत अनोळखी व्यक्तीने फसवले. हा प्रकार जुहू परिसरात घडला असून याविरोधात महिलेने पोलिसात धाव घेतली आहे.
तक्रारदार अनिशा पाटील (४३) या अंधेरी मधील दोन इमारतीत घरकाम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १३ मार्च रोजी सकाळी आठ वाजता त्या कामावर निघाल्या असताना आयसीआयसीआय कॉलनी समोर एक अनोळखी इसम त्यांना भेटला. त्याने तो बिल्डिंगमध्ये ड्रायव्हरचे काम करत असून त्याची मालकीण कुटुंबासह दुसरीकडे शिफ्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील जुना टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशीन आणि १५ किलोचे तेलाचे दोन डबे हे सर्व सामान त्या अवघ्या १० हजार रुपयांना विकत असल्याचे त्याने पाटील यांना सांगितले. मात्र त्यावेळी मला कामावर जायचे आहे असे सांगितल्याने पाटील यांना त्याने त्याचा मोबाईल नंबर देत पुन्हा संपर्क करायला सांगितला.
ही बाब पाटील यांनी त्यांच्या मुलीला फोन करून सांगितली आणि कमी पैशांमध्ये आपल्याला इतके सामान मिळत असून आपण ते घेऊ या असे म्हणाल्या. रात्री १० वाजता काम संपवून त्या घरी परतत असताना पुन्हा तो भामटा त्यांना दिसला आणि मी तुम्हाला माझ्या मॅडमच्या घरी घेऊन जातो तिकडे तुम्ही सर्व सामान पाहून घ्या आणि मगच खरेदी करा असे म्हणाला. त्याने एक रिक्षा थांबवली आणि पाटीलसह तो त्या रिक्षातून निघाला. ही रिक्षा जुहू मार्केटजवळ आल्यावर त्याने पाटीलकडून १० हजार रुपये घेतले आणि मॅडमशी बोलून अजून कमी पैशात तुम्हाला सामान देतो असे म्हणत रिक्षासाठी सुट्टे पैसे आणण्याच्या बहाण्याने उतरला. मात्र बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने पाटीलही रिक्षातून खाली उतरल्या आणि त्यांनी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला. जो त्यांना कुठेच सापडला नाही आणि त्यांनी जुहू पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.