डोहाळे जेवणात लैंगिक अत्याचार, मुलगी मानसिक धक्क्यात; मुंबईतील घटना, परिसर हादरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:19 AM2023-01-19T10:19:52+5:302023-01-19T10:20:10+5:30
सदर बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी, अखेर, सोमवारी मालाड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
मुंबई- डोहाळे जेवणासाठी घरी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी एकाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये समोर आली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने डोहाळे जेवणासाठी ८ जानेवारी रोजी नातेवाइकांना घरी बोलावले. यादरम्यान त्या कार्यक्रमाच्या गडबडीत असताना तेथे आलेल्या २९ वर्षीय नातेवाइकाची त्यांच्या ६ वर्षांच्या मुलीवर वाईट नजर पडली. त्याने, लिफ्ट जवळील अंधाराचा फायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
सदर बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी, अखेर, सोमवारी मालाड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, मालाड पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपी तरुणाला राहत्या घरातून अटक केली आहे. तो मालवणीत रहिवासी आहे. या घटनेने मुलीलाही मानसिक धक्का बसला आहे.
यापूर्वी घडलेल्या घटना
- ७ जानेवारी नागपाड्यात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. नागपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक केली.
- १० जानेवारी वडिलांकडूनच १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी शिवडीत घडली होती.
- १६ जानेवारी आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर सख्ख्या भावानेच शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली होती. २५ मार्च २०१९ पासून मुलीवर अत्याचार सुरु होते.