Join us

दागिन्यांची बॅग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेली चोरीला!

By गौरी टेंबकर | Published: January 29, 2024 5:48 PM

अरायव्हल विभागातील प्रकार, सहार पोलिसात व्यवसायिकाची धाव.

मुंबई: दागिने ठेवलेली बॅग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हीसचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने सहार पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या परिसरात असे प्रकार वाढीस लागल्याने याबाबत विमान प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारदार इरफान वोहरा (४५) यांच्या तक्रारीनुसार ते ३ जानेवारी रोजी बंगळुरू येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पत्नीसोबत गेले होते. तिथून ते ७ जानेवारी रोजी बंगळुरू येथून मुंबईला यायला निघाले. त्यांची फ्लाईट रात्री २.३० ची असल्याने त्यांनी त्यांच्या बॅग एअर इंडिया एक्सप्रेसच्या लगेज सर्व्हीसमध्ये चेक इन केल्या. त्यानंतर  सकाळी ४.३० वाजता मुंबईला पोहोचल्यावर ते फ्लाईटमधून उतरले. मात्र त्यांना त्यांची बॅग नियोजित बेल्ट क्रमांक १३ याठिकाणी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी एअर इंडिया एक्सप्रेसच्या कार्यालयात जाऊन पीआयआर फॉर्म भरत तक्रार केली. बरेच दिवस वाट पाहिल्यावरही त्यांची बॅग त्यांना न मिळाल्याने त्यांच्या पत्नीने बंगळुरू विमानतळावर जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांची बॅग ही मुंबई विमानतळ टर्मिनल २ वर पोहोचली असल्याचे त्यांना समजले. ही बॅग अनोळखी इसमाने बेल्ट क्रमांक १३ वरून उचलल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून तक्रारदाराला दिली. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यामध्ये एक इसम उबेर टॅक्सीने त्यांची बॅग घेऊन विमानतळा बाहेर गेल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी सहार पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :गुन्हेगारी