Join us  

तस्कराच्या पोटातून काढले पाव किलो सोने; जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांची कामगिरी

By संतोष आंधळे | Published: May 12, 2023 12:48 PM

परदेशातून बेकायदा मार्गाने सोने देशात आणण्यासाठी प्रवासी अनेकदा वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबतात.

संतोष आंधळे 

मुंबई : परदेशातून बेकायदा मार्गाने सोने देशात आणण्यासाठी प्रवासी अनेकदा वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबतात. मात्र, विमानतळावरील चाणाक्ष, सजग सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेतून हे गैरप्रकार सुटत नाहीत. संशयावरून प्रवाशाला पकडले की त्याने केलेल्या गैरप्रकाराची पोलखोल करून त्याची रवानगी पोलिसांकडे करायची, हा कारवाईचा ठरलेला साचा. परंतु सोन्याचा हव्यास असलेले काही प्रवासी अनेकदा वेगळाच मार्ग पत्करतात. अशांना मग हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. असाच प्रकार जे.जे. रुग्णालयात नुकताच उघडकीस आला. सोन्याची तस्करी करणाऱ्या या प्रवाशाने तब्बल १४ लाख रुपयांचे पाव किलो सोने पोटातून आणले होते.

  सोन्याचे सात तुकडे इंतिजार अलीने प्लास्टिकचे वेष्टन लावत गिळले होते.  कस्टमच्या अधिकाऱ्यांकडे त्याने तशी माहिती दिली.  अलीची तातडीने जे.जे. रुग्णालयात रवानगी करण्यात आली.  रुग्णालयाच्या सर्जरी विभागात दाखल केल्यानंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्यात त्याची तस्करी उघड झाली.   त्याला सलग तीन दिवस हाय फायबर डाएट दिला गेला. त्यात दररोज एक डझन केळी खायला देण्याचा समावेश होता.   अखेरीस गुरुवारी नैसर्गिक विधीमार्फत प्रवाशाने पोटात लपविलेले सर्व सोन्याचे तुकडे प्राप्त झाले.   सुमारे पाव किलो वजनाचे हे सोने कस्टम अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहिती जे.जे.च्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.   संबंधित तस्कराच्या पोटातून सोने काढण्यासाठी शस्त्रक्रियेचा मार्ग उपलब्ध होता.  इंतिजार अलीने शस्त्रक्रिया करून घेण्यास नकार दिला. 

झाले काय?

 कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर इंतिजार अली या ३० वर्षीय प्रवाशाला ताब्यात घेतले.  या प्रवाशाने सोने दडवून आणल्याचा कस्टम अधिकाऱ्यांना संशय होता.  चौकशीमध्ये अलीने गुन्ह्याची कबुलीही दिली.एक्स रे मध्ये तस्कराच्या पोटात सोने आढळून आले.   एरव्ही तस्करांच्या पोटातून अमली पदार्थाच्या गोळ्या काढण्यात आल्या होत्या. मात्र, सोने काढण्याचा प्रकार प्रथमच जे.जे.मधील डॉक्टरांनी अनुभवला.  

टॅग्स :सोनंपोलिस