मुंबई :
चाकूच्या धाकात ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या त्रिकुटाला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या विरोधात आरोपींविरोधात नवघर, पंतनगर, भोईवाडा, विलेपार्ले , बाजारपेठ कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बांद्रा, सांताक्रुज, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेले मधुकर बाळू दळवी (६०) हे ८ सप्टेंबर रोजी कामानिमित्त बाहेर पडले. दुपारी पावणे तीनच्या सुमारास मॅरेथॉन बिल्डिंग खालील मोकळ्या जागेत एस एल रोड, मुलुंड पश्चिम या ठिकाणी आले असता त्यांना एका अनोळखी इसमाने आवाज दिला. ओळखीचे असल्याचे सांगून संवाद सुरु केला. त्यापाठोपाठ आणखीन दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, तीन सोन्याच्या अंगठ्या व पाकिटामधील २ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच यायाबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दळवी यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत सपोनि गणेश मोहिते व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरु केला.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये अभिलेखावरील आरोपी रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल, संजय मांगडे हे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. ते नवी मुंबईतील एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती मिळताच पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये आरोपी नरेश जयस्वाल याला आजारपणाच्या कारणावरून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीमध्ये असलेल्या दुकलीकडून अधिक तपास सुरु आहे.