Join us

काही शे रुपयांचे कंदील अन् कोट्यवधींची उलाढाल

By मनोज गडनीस | Published: October 28, 2024 11:35 AM

माहीमच्या कंदील गल्लीत फेरफटका मारल्यानंतर या उलाढालीचा अंदाज येतो.

दिव्यांच्या उत्सवाची प्रभा घराघरांत पसरते ती आकाशकंदिलांमुळे. काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त काही विशिष्ट पद्धतीचेच कंदील सर्वत्र दिसायचे. आता मात्र यामध्ये वैविध्य आल्याचे कंदील गल्ल्यांमध्ये फिरल्यावर दिसून येते. कंदिलांच्या या बाजारात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली असून, अगदी १०० रुपयांपासून ते दोन-अडीच हजारांपर्यंत किमतीचे कंदील बाजारात दिसत आहेत आणि या माध्यमातून दिवाळीपूर्वीच्या आठवड्यांत कोट्यवधींच्या उलाढालीची नोंद होत आहे.  

माहीमच्या कंदील गल्लीत फेरफटका मारल्यानंतर या उलाढालीचा अंदाज येतो.  किमान अर्धा फूट आकारांपासून ते सहा-साडेसहा फूट आकारांपर्यंतचे कंदील सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मोठ्या आकाराचे कंदील हे प्रामुख्याने इमारतीच्या आवारात लावले जातात. त्यामुळे त्यांनाही मागणी असल्याचे नीलेश चौधरी या विक्रेत्याने सांगितले.  काही वर्षांपूर्वी एखाद्या इमारतीमधील सर्वच घरांसाठी एकसारखे कंदील घेण्याचा ट्रेंड होता. मात्र कोरोनाकाळानंतर कंदिलांच्या ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे.

आता लोकांना वैविध्य हवे आहे. सध्याच्या घडीला कागदी आकाशकंदिलांपेक्षा जास्त मागणी ही वेताच्या काठ्यांपासून बनवलेले कंदील, कापडापासून बनवलेले कंदील यांची मागणी वाढत आहेत. यांच्या किमती कागदी आकाश कंदिलांपेक्षा जास्त आहेत. कागदी आकाशकंदील किती काड्यांचा आणि त्याचे आकारमान किती यानुसार त्याची किंमत ठरते. अशा कागदी कंदिलांची किंमत ही २०० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत आहे. तर, कापडी आकाश कंदिलांची किंमत ४०० रुपयांपासून अगदी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंतदेखील आहे.

पैठणी, पटोला आदी साड्यांपासून बनवलेल्या कंदिलांची किंमत सर्वाधिक आहे. संदेश महाडे या अन्य विक्रेत्याने सांगितले की, या बाजारात येणारे लोक बाजारात जो कंदील उपलब्ध आहे त्याची सरसकट कंदील खरेदी करत नाहीत, तर काही चोखंदळ ग्राहक हे आपल्याला आधीच त्यांना कोणत्या डिझाइनचा कंदील हवा आहे याची माहिती देतात आणि त्यानुसार कंदील बनवून घेतात. अलीकडच्या काळात रुजलेला अन्य ट्रेंड म्हणजे, लोक केवळ एक कंदील घेत नाहीत तर किमान दोन ते तीन कंदील किंवा एक मोठा कंदील आणि डझनभर लहान कंदील खरेदी करत आहे. हे कंदील मग घरात सर्वत्र लावले जातात. 

कंदिलाच्या व्यवसायात व्यावसायिकांना किमान ३० ते ४० टक्क्यांचे मार्जिन आहे. दिवाळीदरम्यान मुंबईत कंदील उद्योगात होणाऱ्या व्यवहाराची नेमकी आकडेवारी सांगता येत नसली तरी किमान २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल यामध्ये होते, असा अंदाज महाडे यांनी व्यक्त केला. मात्र, हा व्यवसाय आता करणे कठीण जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीत आलेल्या पावसाचा फटका या व्यवसायाला बसला आहे. धारावी, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे आदी परिसरांत कुटीर उद्योगाच्या माध्यमातून कंदिलांची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :दिवाळी 2024