Join us

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात टाकले जाते मोठ्या प्रमाणात डेब्रिज!

By मनोहर कुंभेजकर | Published: April 16, 2023 6:50 PM

दोषींवर कडक कारवाई करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची  आमदार प्रकाश सुर्वे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे फुफुस म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे. मात्र गेले काही दिवस येथील झाडे,झुडपे,हिरवळ नष्ट करत रोज शेकडो ट्रक,टेम्पो इमारतींचे डेब्रिज येथे टाकून पर्यावरणला मोठी हानी पोहचवत आहे.

मागाठाणे विधानसभा क्षेत्राच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या उद्यानातील काजूपाडा,हनुमान नगर येथे ट्रक मधून रोजडेब्रिज टाकण्यात येत असल्याने येथील झाडे नष्ट झाली आहे.तर डेब्रिजमुळे येथे मोठे डोंगर झाल्याचे चित्र आहे.

या संदर्भात मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी संताप व्यक्त केला आहे.दरवर्षी आपण झाडे लावा,झाडे जगवा या उक्ती प्रमाणे पावसाळ्यात सुमारे एक लाख झाडे लावतो.आणि भूमाफिया अश्या प्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काजूपाडा,हनुमान नगर येथे ट्रक,टेम्पो मधून रोज डेब्रिज टाकतात. त्यामुळे येथील पर्यावरणाला मोठी हानी पोहचत आहे.जर आदिवासी बांधवांनी आणि नागरिकांनी आपल्या घरांची डागडुजी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते, मात्र पर्यावरनाला हानी पोहचवणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते अशी याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री व वन मंत्र्यांनी चौकशी करून यामध्ये असलेल्या दोषींवर कडक कारवाई करावी आणि येथील पर्यावरणाचे रक्षण करावे अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई