चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:04 AM2022-12-06T07:04:43+5:302022-12-06T07:04:55+5:30

शनिवारपासूनच दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अनुयायांची रीघ लागली आहे.

A large number of followers gathered at Chaityabhoomi on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvana day | चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

googlenewsNext

सचिन लुंगसे  

मुंबई : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान या दोन पुस्तकांना दादर, शिवाजी पार्क व चैत्यभूमीच्या परिसरात सर्वाधिक मागणी असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित बहुतांशी पुस्तकांची खरेदी विक्री वेगाने सुरू आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी दाखल अनुयायांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. परिणामी परिसरातील पुस्तकांच्या स्टॉलवर होत असलेल्या खरेदी-विक्रीमुळे तीन दिवसांत ७ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास प्रकाशन संस्थांनी व्यक्त केला आहे.

शनिवारपासूनच दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अनुयायांची रीघ लागली आहे. येथे दाखल अनुयायांना ज्ञानाच्या महासागरात पुस्तकांची खरेदी करता यावी म्हणून शिवाजी पार्क मैदानात पुस्तकांचे शेकडो स्टॉल उभारण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, वर्धा आणि अलिगड येथील प्रकाशन संस्थांचा समावेश आहे.

उपस्थित प्रकाशन संस्था
महाकवी अश्वघोष प्रकाशन संस्था, अस्मिता कम्युनिकेशन, नेहा प्रकाशन, रत्नमाला पुस्तक विक्री केंद्र, निर्मिक फाउंडेशन, सत्यशोधक वाचन चळवळ, आनंद साहित्य सदन, प्रशांत पुस्तकालय, युगसाक्षी प्रकाशन, मैत्री बुक सेंटर, लोकवाङ्मय गृह, श्रावस्ती बुक सेंटर, पेरणी प्रकाशन, गौतम बुक सेंटर, ग्लोबल बुक्स, प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय, दीपा बुक स्टॉल, कौशल्य प्रकाशन.

शिवाजी पार्कवर पुस्तकांचे शेकडो स्टॉल आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान या पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. प्राथमिक स्तरावर ५ ते ७ कोटी रुपयांच्या पुस्तकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सकाळी कमी गर्दी असली तरी सायंकाळी मोठी गर्दी होते आहे - तेजविल पवार, प्रकाशक

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडामुळे यावर्षी गर्दी वाढली आहे. पुस्तकांची खरेदी-विक्री मोठी होत असून, १० कोटी रुपयांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील - सोपान बाजी जगताप, प्रकाशक

पुस्तकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुमारे १० ते १५ कोटींच्या आसपास होतील. दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर यावर्षी अनुयायांची गर्दी वाढली आहे. पुस्तकांच्या स्टॉलवरही मोठी गर्दी होत आहे - किशोर जाधव, प्रकाशक

Web Title: A large number of followers gathered at Chaityabhoomi on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvana day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.