अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

By यदू जोशी | Published: June 8, 2024 07:16 AM2024-06-08T07:16:50+5:302024-06-08T07:18:20+5:30

लता वानखेडे झाल्या खासदार; कृपाशंकरसिंह, अरूप पटनायक पराभूत

A leader Devesh Chandra Thakur who spoke fluent Marathi became an MP from Bihar! | अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

मुंबई : अस्खलित मराठी बोलणारा एक नेता आता बिहारमधून लोकसभेवर पोहोचला आहे. देवेशचंद्र ठाकूर हे त्यांचे नाव. ते सीतामढीमधून जनता दल युनायटेडतर्फे निवडून आले आहेत. ठाकूर यांचे मुंबईत घर आहे. ते मूळचे बिहारचे असले तरी त्यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यावेळी ते युवक काँग्रेसचे काम करत.

तेव्हा पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि तत्कालीन मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या संपर्कात ते आले आणि राजकारणात सक्रिय झाले. बिहारमध्ये विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून ते सातत्याने निवडून गेले. बिहार विधान परिषदेचे सभापतीही राहिले आहेत. 

महाराष्ट्राशी कनेक्शन असलेल्या इतर नेत्यांचे काय झाले?
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री कृपाशंकरसिंह हे उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. मात्र, समाजवादी पार्टीचे बाबूसिंह कुशवाह यांनी त्यांचा एक लाख मतांनी पराभव केला. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जात नाही. 

मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले अरूप पटनायक यांचा ओडिशातील पुरी मतदारसंघात पराभव झाला. ते नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बिजू जनता दलाचे उमेदवार होते. मात्र, भाजपचे संबित पात्रा यांनी त्यांचा एक लाखावर मतांनी पराभव केला. प्रचार काळात केलेल्या एका वादग्रस्त विधानानंतरही संबित पात्रा यांनी विजय मिळविला. पटनायक २०१९ मध्ये बिजू जनता दलातर्फे भुवनेश्वरमधून लढले होते आणि भाजपच्या अपराजिता सरंगी यांनी त्यांचा पराभव केला होता. 

बॉलिवूडमध्ये कारकीर्द गाजविणाऱ्या आणि मुंबईशी घट्ट नाते असलेल्या हेमा मालिनी तिसऱ्यांदा मथुरा मतदारसंघातून विजयी झाल्या. कंगना रानौत हिमाचल प्रदेशातील मंडीतून जिंकल्या, तर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून पुन्हा विजयी झाले. गुजरातच्या गांधीनगरमधून दणदणीत विजय मिळविलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्राशी वेगळे नाते आहे. त्यांची सासुरवाडी कोल्हापूरची. तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि यावेळी प्रचंड मताधिक्याने विदिशा मतदारसंघातून जिंकलेले शिवराजसिंह चौहान यांची सासुरवाडी गोंदिया आहे. 

खा. लता वानखेडेंचे महाराष्ट्राशी नाते
मध्य प्रदेशातील सागर मतदारसंघातून ४ लाख ७१ हजार मतांनी जिंकलेल्या लता वानखेडे यांचे महाराष्ट्राशी आणि विशेषत: नागपूरशी जवळचे नाते आहे. त्यांचे माहेर नागपूरला लागून असलेल्या छिंदवाड्याचे; पण त्यांचे बरेच सख्खे नातेवाइक नागपुरात राहतात. त्या कुणबी समाजाच्या आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव बोध. नंदकिशोर वानखेडेंशी विवाह झाल्यानंतर त्या सागरला गेल्या आणि तिथे मध्य प्रदेशातील सर्वांत मोठ्या मकरोनिया या ग्रामपंचायतीच्या तीनवेळा सरपंच राहिल्या.महिला आयोगाच्या राज्य अध्यक्ष आणि प्रदेश भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदीही राहिल्या. त्या अस्खलित मराठी बोलतात, आपल्या मतदारसंघातील मराठीबहुल भागात गेल्यानंतर कटाक्षाने मराठीतूनच बोलतात. 

महाराष्ट्रप्रति मी नेहमीच कृतज्ञ आहे. या राज्याने मला विद्यार्थी म्हणून घडविले आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली आहे. आजही मी महाराष्ट्राशी नाते जपून आहे.
- देवेशचंद्र ठाकूर, खासदार, सीतामढी (बिहार)

माझे सासरचे आणि माहेरचे बरेच नातेवाईक आजही नागपूर, सावनेर या भागामध्ये राहतात त्यांच्याशी माझा सातत्याने संपर्क असतो. सण आदीबाबत माझ्या कुटुंबाने मराठीपण जपले आहे.
- लता वानखेडे,
खासदार, सागर (मध्य प्रदेश)

Web Title: A leader Devesh Chandra Thakur who spoke fluent Marathi became an MP from Bihar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.