पुस्तकांचा अंदाज न घेताच बांधले ग्रंथालय; विद्यापीठातील अडीच लाख पुस्तकं होणार बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:46 AM2022-04-24T04:46:53+5:302022-04-24T07:11:01+5:30

विद्यापीठाची एकूण ग्रंथसंपदा सात लाखांहून अधिक असून त्यातील जवळपास चार ते साडेचार लाख पुस्तकांची ग्रंथसंपदा कालिना संकुलाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात तर उर्वरित फोर्ट येथील ग्रंथालयात आहे.

A library built without anticipating books; Two and a half lakh books in the university will be homeless | पुस्तकांचा अंदाज न घेताच बांधले ग्रंथालय; विद्यापीठातील अडीच लाख पुस्तकं होणार बेघर

पुस्तकांचा अंदाज न घेताच बांधले ग्रंथालय; विद्यापीठातील अडीच लाख पुस्तकं होणार बेघर

Next

सीमा महांगडे 

मुंबई : विद्यापीठातील कालिना संकुलातील नवीन ग्रंथालयाचा प्रशासनाने मेअखेर मुहूर्त निश्चित केला आहे. मात्र, नवीन ग्रंथालयाची क्षमता केवळ दीड ते दोन लाख पुस्तकांना सामावून घेण्याची असल्याने जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात जीर्ण व धूळखात पडलेल्या साडेचार लाख पुस्तकांना येथे कसे हलविणार? तसेच उर्वरित ग्रंथसंपदेचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

विद्यापीठाची एकूण ग्रंथसंपदा सात लाखांहून अधिक असून त्यातील जवळपास चार ते साडेचार लाख पुस्तकांची ग्रंथसंपदा कालिना संकुलाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात तर उर्वरित फोर्ट येथील ग्रंथालयात आहे. नवीन ग्रंथालयात डिजिटल सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने तेथील ग्रंथसंपदेची क्षमता कमी ठेवली असल्याची माहिती ग्रंथालयातील सूत्रांनी दिली. प्रत्यक्ष भेटीत जुन्या ग्रंथालयातील काही भागांची डागडुजी २०१६ मध्ये हाती घेऊनही ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे आढळले. त्यामुळे येथील सर्व पुस्तके नव्या ग्रंथालयात न हलविल्यास ती सुस्थितीत ठेवली जाण्याबाबत शंकाच आहे. उर्वरित पुस्तके तेथेच धूळखात पडणार का, असा प्रश्न सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी उपस्थित केला आहे. नवीन ग्रंथालयाची इमारत उभी करताना संपूर्ण ग्रंथसंपदा स्थलांतरित करता येईल, अशी जागा का उपलब्ध केली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

पाच वर्षांपासून ९० लाखांचा स्कॅनर धूळखात पडून
काळानुरूप ग्रंथालय डिजिटल करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने ७५ ते ९० लाख रुपये खर्च करून स्वयंचलित स्कॅनर विकत घेतला.
मात्र, हा स्कॅनर चालवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे नसल्याने पाच वर्षांपासून हा स्कॅनर विनावापर पडून आहे. 
लवकरच हा स्कॅनर सुरू होईल, असे विद्यापीठाने आश्वासन देऊन दोन महिने उलटले तरीही तो अद्याप सुरू झालेला नाही. या स्कॅनरद्वारे एका तासात एक पुस्तक स्कॅन होऊ शकते. मात्र सध्या २ ते ३ दिवसांत एक पुस्तक अशी डिजिटायझेशनची संथ प्रक्रिया सुरू आहे.  
 

Web Title: A library built without anticipating books; Two and a half lakh books in the university will be homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.