लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शोमन राज कपूर यांच्या चेंबूर येथील बंगल्याच्या जागी लवकरच आलिशान टॉवर उभारण्यात येणार असून या प्रकल्पाद्वारे ५०० कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे समजते. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज कपूर यांच्या या बंगल्याची खरेदी गोदरेज प्रॉपर्टीज या कंपनीने केली होती. ही खरेदी १०० कोटी रुपयांच्या आसपास झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याची तयारी कंपनीतर्फे सुरू करण्यात येत आहे.
राज कपूर यांचा बंगला देवनार येथे असून राज कपूर यांचा विवाह होईपर्यंत ते तिथे वास्तव्यास होते. त्यांच्या या बंगल्याच्या जागेवर किमान दोन लाख चौरस फूट बांधकाम करण्यात येणार असून याद्वारे ५०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्टुडिओचीही खरेदी मे २०१९ मध्ये राज कपूर यांचा देवनार येथे असलेल्या आर. के. स्टुडिओची देखील खरेदी गोदरेज समूहाने केली होती. सव्वादोन एकर जागेवर बांधण्यात आलेल्या या स्टुडिओची विक्री २०० कोटी रुपयांच्या आसपास झाली होती. त्या ठिकाणी देखील आलिशान प्रकल्प साकारण्यात येत आहे, तर राज कपूर यांचा वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या कृष्ण-राज या बंगल्याची देखील विक्री करण्यात आली असून तेथे देखील आलिशान प्रकल्प उभारला जात आहे.