Join us

एक मेल अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड; दोन कर्मचाऱ्यांनीच केली खासगी शिक्षण संस्थेची पावणेतेरा कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 9:22 AM

वरळीतील अपग्रेडचे लर्निंग एक्सपीरियन्सचे अध्यक्ष वरुण पवनकुमार गर्ग (३२) यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  वरळीतील अपग्रेड एज्युकेशन प्रा. लिमिटेड या खासगी शिक्षण संस्थेतील असोसिएट डायरेक्टर आणि मॅनेजरने नातेवाईक, मित्रांना व्हेंडर आणि शिक्षक भासवून संस्थेची पावणेतेरा कोटींनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वरळीत समोर आला आहे. एका निनावी मेलनंतर या घोटाळ्याला वाचा फुटली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांविरुद्ध मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. 

वरळीतील अपग्रेडचे लर्निंग एक्सपीरियन्सचे अध्यक्ष वरुण पवनकुमार गर्ग (३२) यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेचे २०१२ पासून देशभरात ऑनलाइन एज्युकेशन देण्याचा व्यवसाय आहे. संस्थेकडून उच्च शिक्षणाच्या पदवीसाठी ऑनलाइन मार्गदर्शन व शिक्षण पुरविण्याचे काम चालते.  कंपनीत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम कंपनीतील अकॅडमिक असोसिएट ही टीम करते. २०१८ पासून कंपनीत काम करणाऱ्या ओजस गुप्ताने वेळोवेळी पदोन्नती मिळवून  या विभागात असोसिएट डायरेक्टर या पदावर काम करत होता. तर, केशव अग्रवाल मॅनेजर पदावर कार्यरत होता. ऑनलाइन सेशन झाल्यानंतर केलेल्या शिक्षकांना पेमेन्ट देण्यासाठी इन्व्हॉइस तयार करून कंपनीच्या फायनान्स टीमला देण्याचे काम गुप्ताच्या नेतृत्वात सुरू होते. याचाच फायदा घेत त्यांनी हा घोटाळा केला आहे.

चौकशी करताच... गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी कंपनीच्या संचालकांच्या मेल आयडीवर आलेल्या निनावी ई-मेलमध्ये ओजस गुप्ता आणि केशव अग्रवाल हे कंपनीत खोटी बिले सादर करून घोटाळे करत असल्याच्या माहितीने खळबळ उडाली. कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली. यासाठी खासगी कंपनीची नेमणूक करून चौकशी करताच दोघांचा घोटाळा उघडकीस आला. 

अशी केली फसवणूकअग्रवाल आणि  गुप्ता यांचा गिग्स फॉर एज्युकेशन या प्रोप्रायटरी फर्मच्या मालकासोबत नाते संबंध आढळून आले. याच कंपनीला व्हेंडर कंपनी भासविण्यात आले होते. ती अग्रवालच्या वहिनीच्या नावे असल्याचे आढळून आले. पुढे, दोघांनी त्याची आई, बहीण, भाऊ कर्मचारी म्हणून दाखविण्यात आल्या. दोघेही वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याकडून आलेली बिले मान्य करण्यात येत होती. त्यांनी, खरोखर लेक्चर झाले की, नाही याबाबत चौकशीही केली नाही. अशाच प्रकारे जवळपास १०२ जणांना वेंडर, शिक्षक भासवून त्यांनी ऑनलाइन लेक्चर घेतल्याचे सांगून त्यांच्या नावाने १२.७५ कोटी रुपयांवर डल्ला मारला.बोगस वेंडर बरोबरचे बनावट ऑनलाइन शिक्षण घेतल्याबाबत  इन्व्हाईस करारपत्र सादर करण्यात आली. यामध्ये बनावट वेंडरचे नाव, ईमेल आयडी, बँक खाती, शिक्षण दिल्याचा कालावधी इत्यादीची माहिती देण्यात आली. 

चौकशीदरम्यान सोडली मुंबई घोटाळा उघडकीस आल्याचे समजताच २६ नोव्हेंबर रोजी अग्रवालने भावाची तब्येत ठीक नसल्याने मुंबई सोडून कायमस्वरूपी जयपूर गाठल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ गुप्ता जाळ्यात अडकताच त्याने हा घोटाळा अग्रवालने केल्याचे सांगून दोन दिवसाने त्यानेही मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगून राजीनामा देत असल्याचा मेल कंपनीला पाठवून नॉटरिचेबल झाला.

टॅग्स :धोकेबाजी