Join us

भामट्या आर्मीमनचा बँकरला लाखोंचा गंडा; वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू

By गौरी टेंबकर | Published: January 08, 2024 5:04 PM

बँकरला एका भामट्याने तो आर्मीमन असल्याचे भासवत लाखो रुपयांचा चुना लावला.

गौरी टेंबकर, मुंबई: स्वतःचा फ्लॅट ओएलएक्स या ॲपवर भाड्याने देण्यासाठी पोस्ट केल्यानंतर बँकरला एका भामट्याने तो आर्मीमन असल्याचे भासवत लाखो रुपयांचा चुना लावला. या विरोधात त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार राजकमल वर्धराजन (५०) हे मालाडमध्ये एका नामांकित बँकेत काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार नवी मुंबईच्या पनवेलमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे जो त्यांना भाडेतत्त्वावर द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी याबाबत ओएलएक्स ॲपवर ३ जानेवारी रोजी याची माहिती पोस्ट केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःला आर्मीचा मेजर म्हणणाऱ्या आदित्य कुमार नावाच्या व्यक्तीने फोन करत तो गुजरातच्या गांधीनगर इथून बोलत असल्याचे वर्धराजन यांना सांगितले. तसेच त्याला त्यांचे घर भाडेतत्त्वावर घ्यायचे असल्याचेही म्हणाला. तेव्हा तक्रारदाराने त्याला डिपॉझिटसाठी २.४८ लाख रुपये मागितले. मात्र भामट्याने त्यांना आहे पैसे आर्मीच्या वतीने दिले जातील असे उत्तर दिले.

त्यानंतर ७ जानेवारीला दुपारी आर्मीचे अकाउंटंट फोनवर बोलून पैसे ट्रान्सफर करतील असे म्हणत वर्धराजन यांच्या पत्नीचा बँक अकाउंट नंबर त्यांनी घेतला. डिपॉझिट पाठवण्यासाठी आधी तुम्ही एक लाख रुपये पाठवा आणि मी डिपॉझिट च्या पैशासह ते पैसे तुम्हाला परत पाठवतो असे तो म्हणाला. तो आर्मीमध्ये काम करत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवत वर्धराजन यांनी त्याला ते पैसे पाठवले.  मात्र त्याने फक्त पन्नास हजार रुपये तक्रारदाराला पाठवले आणि बोलण्यात गुंतवत जवळपास २.४८ लाख रुपयांचा चुना लावला. तसेच पुन्हा फोन केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसधोकेबाजी