मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला
By धीरज परब | Updated: January 3, 2025 23:42 IST2025-01-03T23:38:59+5:302025-01-03T23:42:18+5:30
Mira Road Crime news: मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग सेंटरमध्ये एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला
मीरा रोड रेल्वे स्थानक जवळील शॉपिंग सेंटर मध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटर बी विंग भागात शम्स सब्रीद अन्सारी उर्फ सोनू (वय ३५ ) हा साहित्य विकायचा.
शुक्रवारी रात्री साडे नऊ-पावणे दहाच्या सुमारास दुकान बंद करून शम्स हे बाहेर उभे होते. त्यावेळी चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेल्या हल्लेखोराने जवळून शम्स यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सह नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर जगदाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी, मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक अविराज कुराडे व अधिकारी, कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली .
गोळीबार करून हल्लेखोर हा पसार झाला असून, स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा हल्लेखोराचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरु होती.
मयत एका गुन्ह्यात होता साक्षीदार
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शम्स हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता. त्याला धमक्या दिल्या जात होत्या व तशी तक्रार त्याने पोलिसात केली होती. यामागे त्याच भागातील युसूफ नावाच्या इसमाचे नाव येत आहे.
युसूफकडून जीवाला धोका असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या, असे घटनास्थळाजवळ जमलेल्यानी सांगितले. पोलीस हे संशयित युसूफ नावाच्या इसमाचा शोध घेत आहेत.