Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 21:39 IST2025-01-04T21:37:32+5:302025-01-04T21:39:43+5:30
मीरा रोडमध्ये एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासातून या हत्येचे वेगळेच कारण समोर आले आहे.

Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण
-धीरज परब, मीरा रोड
Mira Road Crime News: मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शॉपिंग सेंटरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. रुमालाने तोंड बांधून आलेल्या अज्ञात आरोपीने मयताच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शांती शॉपिंग सेंटर येथील मीरामणी हॉटेलकडे जाणाऱ्या जिन्याजवळ शुक्रवारी रात्री शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू (वय ३५, रा . न्यू सबा अपार्टमेंट , नर्सिंग गल्ली, नया नगर) हा इसा इब्राहिम शेख (वय २६ वर्षे, रा. डोंगरी गाव, भाईंदर) याच्यासोबत बोलत उभा होता.
शम्सच्या डोक्यात झाडली गोळी
त्याचवेळी डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेला इसम आला आणि त्याने शम्स याच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गोळी झाडून हल्लोखोर पळू लागला असता, इसा हा त्याला पकडण्यासाठी काही अंतरापर्यंत धावला. तोच हल्लेखोराने त्याच्यावर पिस्तूल रोखली.
इसावरही झाडणार होता गोळी, पण...
गोळी झाडण्यासाठी पिस्तुलची स्लाईड मागे घेत असतानाच त्यातील मॅगझीन खाली पडल्याने हल्लेखोर इसा याच्यावर गोळी न झडताच पळून गेला. नया नगर पोलिसांना ती मॅगेझीन सापडली आहे. तसेच हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळाले आहे.
इसा याच्या फिर्यादीवरून या गोळीबार व हत्ये प्रकरणी नया नगर पोलिसांनी शनिवार (४ जानेवारी) युसूफ मन्सूर आलम (रा. बॅक रोड, नया नगर) आणि अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला.
युसूफ हा स्टेशन समोरच्या शांती सागर हॉटेलजवळ फुटपाथवर बाकडा लावतो. तो फेरीवाला असून, त्याचे अन्य काही धंदे देखील तिकडे लागतात.
काय होता वाद?
शांती सागर हॉटेल जवळील फुटपाथवर कपडे विक्रीचा बाकडा लावणाऱ्या इसा शेख याला सोनू हा कपडे पुरवायचा आणि त्यांचा भागीदारीत धंदा चालायचा. १ जानेवारी रोजी इसाच्या शेजारी बाकडा लावणाऱ्या युसूफ याने ही माझी जागा असून, इकडे धंदा लावायचा नाही असे धमकावले होते.
मी ६ महिन्यापासून येथे धंदा लावत असून, महापालिकेची पावती नियमित भरतो, असे इसा याने सांगितले. त्यावर युसूफ याने ते मला माहित नाही इकडे धंदा लावायचा, तर मला भाडे द्यावे लागेल असे सांगून शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केली होती.
त्यानंतर युसूफसह सैफ मन्सूर आलम व काशीफ मन्सूर आलम व गणेश या चौघांनी इसा याला बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी फायटरने डोक्यात मारून जखमी केले होते. या प्रकरणी नया नगर पोलिसांनी युसूफसह एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला होता.
युसूफ आणि सोनू यांच्यात देखील सदर ठिकाणी धंदा लावण्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरु होता. याशिवाय शांती शॉपिंग सेंटरमध्ये युसूफ याने ए ३९ हा गाळा भाड्याने घेतला होता. शेजारचा ए ४० या गाळेधारकासोबत दुकानाच्या बाहेर सामान लावण्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा.
नोव्हेंबरमध्ये या वादातून युसूफवर गुन्हा दाखल केला गेला होता. त्यात सोनू हा युसुफच्या विरोधातील साक्षीदार होता. सोनूने सुद्धा बी ८२ हा गाळा भाड्याने घेतला होता. सोनू हा इसा यालासुद्धा मदत करायचा व इसाच्या फुटपाथवरील धंद्यात तो भागीदार सुद्धा होता.
मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील १५० मीटर परिसर फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित असताना महापालिका आणि राजकारणी यांच्या आशीर्वादाने येथे सर्रास अतिक्रमण करून फेरीवाले - बाकडे वाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यात सार्वजनिक जागा असताना तेथे धंदा करण्यासाठी फेरीवाला युसूफ हा भाडे वसुली करत होता हे समोर आले आहे.
पोलिसांचे देखील दुर्लक्ष
आरोपी, फिर्यादी आणि मयत आदींमध्ये बाकडा व धंद्यावरून अनेकदा वाद होऊन गुन्हे दाखल झाले होते. तर युसूफ विरोधातील दाखल गुन्ह्यात सोनू हा साक्षीदार होता. सोनू याला धमक्या दिल्या जात होत्या. त्याबाबत सुद्धा तक्रारी व पत्र दिली गेली होती. परंतु पोलिसांनी देखील वेळीच ठोस पावले न उचलल्याने सोनू याची हत्या झाल्याचे आरोप होत आहेत.
युसुफ याने सुपारी देऊन हत्या केली का? हल्लेखोर बाहेरून मागवण्यात आल्याची शक्यता आदी बाजूने पोलीस तपास करत आहेत.