Join us

मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 8:58 AM

अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेणार

मुंबई : आम्ही बिझनेस करायला मुंबईत आलो  नाही, आम्ही मुंबईला सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने घर उभे केले त्यांची मुंबई आहे. गेली २५ वर्षे काहींनी मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. गेल्या १० वर्षांत मात्र आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. मुंबईतील मराठी माणसाला आम्ही हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते करू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर व भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये प्रवीण दरेकर यांच्यासोबत बैठका घेतल्या. मुंबईतील माणूस आपले स्वतःचे घर का घेऊ शकत नाही, त्यावर शासन निर्णय केला. मात्र २०१९ मध्ये सरकार गेले. ज्यांनी आपण मराठी माणसासाठी आहोत, अशा वल्गना केल्या. त्यांनी २०१९ चा शासन निर्णय बिल्डरधार्जिण्या लोकांसाठी गुंडाळून ठेवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार आले. आपल्या १६ मागण्या पूर्ण केल्या.

प्रवीण दरेकर म्हणाले, आमच्या २२ पैकी १६ मागण्या मान्य करण्याचे काम फडणवीस यांनी केले. येत्या काळात हा परिसर भाजपचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही. आशिष शेलार म्हणाले की, मी गिरणगावात जन्मलो आहे. चाळ पडली म्हणून संक्रमण शिबिरात राहिलो. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची अडचण माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना ९ मेट्रो दिल्या. जुन्या चाळीची व्याख्या बदलली. हेरिटेज टीडीआर आणला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस