Join us

'कोसला' कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा'; दादासाहेब फाळकेंसारखी कामगिरी कोणीतरी करावी - भालचंद्र नेमाडे

By संजय घावरे | Published: November 27, 2023 7:31 PM

'कोसला' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते.

मंबई - दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांतारामांसारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. बंगाली चित्रपटांना जगभर जितका मान आहे तितका मराठीला नाही. अशी कामगिरी कोणीतरी करावी अशी आशा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. 'कोसला' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते.

मागील ६० वर्षांपासून जगभरातील वाचकांच्या मनावर गरुड करणाऱ्या भालचंद्र नेमाडे लिखित 'कोसला' या गाजलेल्या कादंबरीवर मराठी चित्रपट बनवण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात नेमाडे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, निर्माते मेहुल शाह, दिग्दर्शक आदित्य राठी, गायत्री पाटील, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात पं. दिग्विजय वैद्य यांचे पुत्र जयदीप वैद्य यांनी गायलेल्या कबीरांच्या निर्गुणी भजनांनी झाली. या दरम्यान सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्या टीमने एका मोठ्या कॅनव्हासवर चित्र रेखाटले, जे सिनेमाची कथा विशद करणारे होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात पुढे नेमाडे म्हणाले की, मीसुद्धा  'कोसला'मधील ९९ लोकांपैकीच एक आहे. मला शंभरातला एक नेहमी नको असतो. ९९ हा आकडा पाहिला तर तो सारखा सारखा पुढे जाणारा आहे. त्यामुळे ९९ आकडा कादंबरीत वापरला. ९९ सारखे आपण व्हायला पाहिजे. मी चित्रपटांचाही खूप मोठा शौकीन आहे. साहित्याइतकेच माझे चित्रपटांवरही खूप प्रेम आहे. मी खूप सिनेमे पाहिले आहेत. खूप चांगले सिनेमे दाखवावे आणि पाहावे या मताचा मी आहे. 'कोसला'च्या निमित्ताने माझे पाऊल चित्रपटांपर्यंत पोहोचल्याचेही नेमाडे म्हणाले.

सयाजीमुळे जुळला चित्रपटाचा योग...सयाजी निर्माते-दिग्दर्शकांना माझ्यापर्यंत घेऊन आले. आतापर्यंत मोठमोठ्या लोकांनी प्रयत्न केले, पण कोणालाही या कादंबरीवर सिनेमा करणे जमले नाही. त्यामुळे हे लोकही वर्षभराने थकून परत येतील असे वाटले होते, पण हे वस्ताद निघाले. यांचे काम आणि यांनी विचारलेले प्रश्न ऐकून पुढे कादंबऱ्या लिहिण्याकरीता उत्साह आला आहे. 

योग्य तेच दाखवा...नेमाडे बोलण्याच्या ओघात बऱ्याच गोष्टी बोलतात, पण मीडियाने त्याचा विपर्यास करून दाखवू नये अशी नम्र विनंती करत सयाजी म्हणाले की, या सर्व गोष्टींचा त्यांना खूप त्रास होतो. मुंबईला आल्यावर 'कोसला' कादंबरीतील बरेच उतारे तोंडपाठ केले होते. अभिनयासाठी याचा वापर व्हावा यासाठी त्यावर काम केले. योगायोगाने निर्मात्यांचा फोन आला आणि मी फक्त नेमाडेंपर्यंत त्यांना पोहोचवले. पुढचा निर्णय त्यांनीच घेतला. चित्रपट ही कला सर्व कलांना एकत्र घेऊन जाणारी आहे. याद्वारे 'कोसला' रसिकांसमोर येणार आहे.

अनेकांची तोंडपाठ आहे कादंबरी...एक प्रत सरासरी शंभर लोक वाचू शकतात असा सर्व्हे आहे. त्यानुसार 'कोसला'च्या दीड लाख प्रती किती लोकांनी वाचल्या असतील याचे गणित करता येईल. सोलापूरातील एका मुलीची पूर्ण कादंबरी पाठ आहे. त्यावरून एक मित्र म्हणाला की, संत तुकाराम महाराजांचे अभंग जसे जाळून टाकले तशी तुझी कोसला कोणी जाळली तरी ती पाठ केलेली एक मुलगी आहे. कादंबरी पाठ असलेली बरेच लोक आहेत. काही जण कोसला वाचून आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाल्याचेही नेमाडे म्हणाले. 

टॅग्स :सिनेमामराठी चित्रपट