Join us

नामांतर... बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय आता, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 6:15 PM

दुसरीकडे बारामतील येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही नामांतरण करण्यात आले.

मुंबई - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८ वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथे पहाटेपासूनच लगबग होती. या जयंती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जुन हजर होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहमदनगरचे नामांतर अहिल्या नगर करणार असल्याची घोषणा केली. तर, दुसरीकडे बारामतील येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही नामांतरण करण्यात आले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेचे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती" असे नामांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन यांनी यासंदर्भातील शासन आदेश आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

विभागाच्या संदर्भ क्र. १ वरील दिनांक ०३.०१.२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र. २ वरील दिनांक ०५.०७.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे. सदर संस्थेचे नामाधिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

टॅग्स :बारामतीगिरीश महाजनवैद्यकीयहॉस्पिटल