Join us

शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:13 PM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ देखील उपस्थित होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीआधी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन सरकारच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये ओबीसी नेत्यांना धमक्या येत असल्यामुळे तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसी नेत्यांना तात्काळ सुरक्षा देण्याबाबत दोन्हीही नेत्यांना आश्वासन देण्यात आलं. 

मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक देखील बोलावली आहे. उद्या सायंकाळी ६ वाजता ही बैठक वर्षा या निवासस्थांनी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राजकीय नेत्यांना बसला आहे. याठिकाणी सकाळी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती त्यानंतर आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे. 

आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये- CM शिंदे

मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण देत असताना इतर घटकांवर अन्याय होणार नाही. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे. आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

...तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल- 

आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाविलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेवून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील