नागपूर : इस्माईल युसूफ महाविद्यालय ते पंपहाउस, बिंबिसारनगर ते आरे चेक नाका जंक्शन, ओबेराय मॉल रस्ता जंक्शन ते आरे चेक नाका जंक्शन या मार्गावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नागपूर अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा यांची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या अनुषंगाने सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, इस्माईल महाविद्यालय ते पंपहाउसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या कामाकरिता मे. करगवाल कन्स्ट्रक्शन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कार्यादेश दिले असून, त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व्हिस रोडचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यासाठी शासनाच्या वतीने कार्यवाही केली जाईल. तसेच बायपासचे काम चांगल्या प्रकारे होईल, या दृष्टीने प्रयत्न करणार असून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीसंदर्भात पालिकेला सूचना दिल्या जातील. तसेच अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
वाहतुकीस अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ओबेरॉय जंक्शन ते आरे चेक नाका यादरम्यान सर्वोदयनगर येथील सेवा रस्त्यावर बेकायदा उभ्या असणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांवर मुंबई पोलिस वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक विभागामार्फत गस्त करण्यात येत असून, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही सामंत यांनी सांगितले.