Join us

पश्चिम द्रुतगती महामार्ग मालाड पूर्वेला उभारले वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज शौचालय

By मनोहर कुंभेजकर | Published: January 31, 2023 4:01 PM

मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या प्रवाशांना दिलासा

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रोज पश्चिम द्रुतगती महामार्गावरून सुमारे पाच लाख वाहने मुंबईकडे आणि मालाड -दहिसरकडे जातात. त्यातच सध्या अंधेरी ते दहिसर अनेक कामे सुरू असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना तासंतास गाडीत बसून राहत लागत असल्याने शौचालया अभावी नागरिकांचे आणि विशेषकरून मधुमेह आणि रक्तदाबग्रस्त नागरिकांचे आणि माहिलांचे खूप हाल होत होते.

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव  जवळ वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज निर्मल शौचालय उभारून शिवसेनेने मधुमेह आणि रक्तदाब रुग्णाना व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश याकडे जाणाऱ्या एसटी आणि खाजगी बसेसने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थांब्याच्या ठिकाणी शौचालय असावे अशी मागणी होती.कांदिवली पासून वांद्रेच्या दिशेने जाताना साऊथ बॉण्ड दिशेला मालाड पूर्वेला शौचालय असावे म्हणून शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू प्रयत्नशील होते. एमएमआरडीए कडून परवानगी घेऊन आमदार सुनिल प्रभु यांनी सौंदर्यिकरण निधीतून न्हणीघरा सहित वातानुकूलित भारतीय बैठकीचे आणि इंग्रजी बैठकीचे वातानुकूलित शौचालय बांधून घेतले.

 आमदार प्रभू यांच्या हस्ते या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पैसे द्या व वापरा वातानुकूलित शौचालयाचे परिरक्षण कुटीर मंडल संस्थे द्वारे केले जाणार  असल्याची माहिती यावेळी बोलतांना आमदार सुनिल प्रभु यांनी दिली. 

यावेळी माजी उपमहपौर अँड.सुहास वाडकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजित रावराणे, विधानसभा संघटक  प्रशांत कदम, विष्णू सावंत, रीना सुर्वे, पूजा चौहान, उपविभाग प्रमुख गणपत वरिसे,  प्रदिप निकम, भाई परब, सुनिल गुजर, सानिका शिरगावकर, शाखा प्रमुख रामचंद्र पवार, कृतिका शिर्के आणि शिवसैनिक तसेच येथील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई