मुंबई : महापालिकेच्या सीबीएसई माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा हळूहळू वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रमाला साजेशी आणि सर्व सुविधांयुक्त अशी विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या अन्य मंडळांच्या शाळांसाठी दर्जेदार विज्ञान प्रयोगशाळेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, येत्या शैक्षणिक वर्षात या प्रयोगशाळांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
पालिकेच्या १४ अन्य मंडळांच्या शाळा असून, यामधील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी जास्त आहे. पालिकेच्या या विज्ञान प्रयोगशाळांमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विषयांसाठी स्वतंत्र विभाग असणार आहे. सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाची रचना ही राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमातून वेगळी असल्याने अनेकदा या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांमध्ये मर्यादा व अडचणी येत असतात. त्यामुळे सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला आवश्यक आणि दर्जेदार आणि सर्व उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
गणित, विज्ञान केंद्र :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या २५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नावीन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याचे पालिका शिक्षण विभागाकडून यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यासाठी ४.५० कोटींची तरतूद केली आहे.
यू-ट्यूबवर शैक्षणिक व्हिडीओ :
पालिकेच्या दादर येथील स्टुडिओत रेकॉर्डिंग केलेल्या अभ्यासक्रमाचे, तज्ज्ञ शिक्षकांचे व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध करण्यात येतात. या स्टुडिओसह शाळांमध्ये असणाऱ्या डिजिटल क्लासरुममधील दहा वर्षांपूर्वीची मशिनरी बदलून त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. ‘प्री-लोडेड’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम परिणामकारकरीत्या शिकवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांचे काम सुरू :
पालिकेच्या एकूण ५४ शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी अर्थसंकल्पात १.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांमध्ये खगोलशास्त्र प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार.
यानंतर लोकसहभाग, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने संख्या वाढवण्यात येईल. यामध्ये टेलिस्कोपसह विद्यार्थ्यांच्या वयानुसार वापरता येणारी अभ्यास साधने, यंत्रे उपलब्ध करण्यात येतील. यामुळे विद्यार्थी रात्री आणि दिवसाही उघड्या डोळ्यांनी साधनांच्या सहाय्याने खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकणार आहेत.