मुंबई - शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. तसेच अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यावरूनही राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेते भाजपमध्ये जातील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर, फडणवीसांवरही त्यांनी टीका केली आहे. त्यावर, आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी, त्यांनी रोहित पवारांना ज्योतिषी संबोधलंय.
मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील भेट सदिच्छा भेट असू शकते. किंवा ठरल्याप्रमाणे भाजप काम करत नाही, यासह अनेक विषय असावेत. त्यामुळे १०० टक्के नाराजी आहे. फक्त नेत्यांमध्येच नाराजी नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. मला आणि लोकांना असे वाटते की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे-पवार गटातील काही नेते थेट भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली. रोहित पवारांच्या या विधानाच संदर्भ देत नितेश राणेंनी त्यांना ज्योतिषी म्हटलं आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे. आजकाल महाराष्ट्रात चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आलाय, ज्यांना अजित दादांच्या चेहऱ्यावर काय लिहिलंय, देवेंद्र फडणवीस कोणाच्या मागे आहेत, या सगळ्याच बाबतीत तो फार मोठा ज्योतिषी करतो, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या भाकितावर प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले होते रोहित पवार
शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांना लोकसभेपुरतेच वापरले जाईल. त्यांचे महत्त्व न राहिल्यानंतर सोडून दिले जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. सुरुवातीला नेत्यांना आणि सामान्य नागरिकांना आमिषे दाखवायची, परंतु जेव्हा प्रत्यक्षात आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा काही करायचे नाही, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
तेजस अन् आदित्यमध्ये भांडणं कोण लावतंय - राणे
दोघांमध्ये भांडणे होतात का पाहणे, फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रत्यूत्तर दिले. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी विचारला. ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या आणि भांडणं लावत होतात, त्याचमुळे तुम्हाला फिरायला दिले नाही. पवार घराण्यामध्ये तुम्ही काय काड्या लावल्यात ही माहिती महाराष्ट्राला दिली तर कुणी तुम्हाला घरात देखील उभे करणार नाही. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतेय, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.