मुंबई : करीरोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीच्या कचऱ्यात एका ५ ते ६ दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
सुरक्षा अधिकारी अमोल अरविंद पवार (३६) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, दोन्ही विंगचे मिळून एकूण ४५० फ्लॅट इमारतीमध्ये आहेत. प्रत्येक मजल्यावर जिन्याजवळ कचरा टाकण्याकरिता एक रूम बनविण्यात आली असून, प्रत्येक मजल्यावरील कचरा त्या रूममध्ये असणाऱ्या दोन लोखंडी पाईपाद्वारे टाकला जातो. हा कचरा बेसमेंटमध्ये असणाऱ्या कचरा वर्गीकरण खोलीत येतो. ३० जानेवारी रोजी बी विंगमधील कचरा वर्गीकरणाचे काम संपवून कामगार निघून गेले. बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुन्हा वर्गीकरणाचे काम सुरू असताना, त्यामध्ये नवजात बालिकेचे तोंड लाल रंगाच्या कपड्याने गुंडाळलेल्या स्थितीत दिसून आले.
अधिक तपास सुरू :
बालिकेची नाळ अर्धवट कापलेली दिसून आल्याने खळबळ उडाली. वरून कोणीतरी तिला खाली फेकल्याच्या संशयातून त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत कळवले.
घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बालिकेचा मृतदेह तत्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. सीसीटीव्ही तसेच गर्भवती महिलांबाबत माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.