Join us

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आली...

By सचिन लुंगसे | Published: November 25, 2022 11:29 AM

गुजरातमधील सक्करबाग येथील आशियायी सिंहाची जोडी अखेरीस बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे.

मुंबई :

गुजरातमधील सक्करबाग येथील आशियायी सिंहाची जोडी अखेरीस बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. २६ सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते.

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी आता मुंबईत दाखल झाली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात १९७५-१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारी मुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केली. आणि येथील सिंहाची संख्या कमी झाली.

गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना आशियायी सिंहाची जोडी पाहता यावी म्हणून उद्यान प्रशासन सातत्याने प्रयत्न करत होते.

टॅग्स :मुंबई