लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णाला युरिन बॅग लावली असल्याने कँटिनमधून हाकलल्याची धक्कादायक घटना केईएम रुग्णालयात घडली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या डीनकडे तक्रार नोंदविण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्याण येथील विजय कांबळे (६६) शनिवारी नियमित उपचारासाठी मुलगी गायत्री यांच्याबरोबर रुग्णालयात आले होते. गायत्री त्यांना रुग्णालय परिसरातील कँटिनमध्ये जेवावयास घेऊन गेल्या. त्यांनी त्या ठिकाणी जेवणाची ऑर्डरही दिली. मात्र, युरिन बॅग लावलेल्या रुग्णांना कँटिनमध्ये प्रवेश नाही, असे सांगत ठेकेदाराने विजय कांबळे यांना तेथून बाहेर जाण्यास सांगितले.
वडिलांच्या अपमानाबद्दल गायत्री यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. रुग्णालयाच्या अधिष्ठाताडॉ. संगीता रावत यांनी यासंदर्भात गायत्री यांच्याशी संवाद साधत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गायत्री यांना दिले.