देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे फिरली सूत्रे, उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या गटात नवा गडी, नवे राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:48 AM2024-03-15T09:48:41+5:302024-03-15T09:50:15+5:30
भाजपने या मतदारसंघात नवीन चेहऱ्यास संधी दिल्याने भाजपच्या गटात कार्यकर्त्यांमध्येही ‘नवा गडी, नवा राज्य’ची कुजबुज सुरू होती.
मनीषा म्हात्रे, मुंबई : उत्तर पूर्व मुंबईलोकसभा मतदारसंघातून भाजपकडून अखेरच्या क्षणाला मनोज कोटक यांचा पत्ता कापत, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारीसाठी फोन गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कार्यकर्त्यांमध्येही ‘कही खुशी, कही गम’चे चित्र दिसून आले. भाजपने या मतदारसंघात नवीन चेहऱ्यास संधी दिल्याने भाजपच्या गटात कार्यकर्त्यांमध्येही ‘नवा गडी, नवा राज्य’ची कुजबुज सुरू होती.
उत्तर पूर्व अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुलुंड, घाटकोपर पूर्व/पश्चिम भाजपचा गड आहे. भांडूप, विक्रोळी शिवसेनेचा बालेकिल्ला, तर शिवाजीनगर, गोवंडी भागात समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. २०१९ मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेची मनधरणी करावी लागली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पत्ता कापून कोटक यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता.
आपल्याला संधी मिळेल, या दृष्टीने कोटक यांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू झाली होती. घाटकोपरमध्ये त्यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही झाले. पीआर एजन्सीसह निवडणुकीची रणनीती ठरत असतानाच, दोन दिवसांपूर्वीच त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चाहूल लागली आणि त्यांच्या तयारीला ब्रेक लागला.
‘आमच्यासाठी पक्ष सर्वतोपरी’ -
भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच कोटेचा यांनी सांगितले, की किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांनी चांगले काम केले आहे. आम्ही पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहोत. जी जबाबदारी दिली आहे, ती मी ताकदीने पार पाडेन. हा व्यवस्थेचा भाग आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सैनिक आहे. आमच्यासाठी पक्ष सर्वतोपरी आहे. लोकसभा उमेदवारीबाबत मला शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचे सांगितले.
भाजपच्या यादीत आ. मिहीर कोटेचा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कोटक यांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर दिसून आला. ईशान्य मुंबईत भाजपच्या गटात अंतर्गत धुसफूस होती. कोटक यांच्या कार्यकर्त्यांचीही एक फळी तयार झाली होती. ती अन्य कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा सूर दबक्या आवाजात सुरू होता. दरम्यान, कोटेचा यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.