आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:00 AM2024-06-28T10:00:13+5:302024-06-28T10:00:30+5:30
डीएनए अहवालातून स्पष्ट; पोलिसांच्या तपासाला यश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालाडमधील डॉ. ब्रँडन फेर्राव यांनी ऑनलाइन मागविलेल्या आइसक्रीम कोनमध्ये सापडलेले मानवी बोट हे पुण्यातील यम्मो आइस्क्रीमच्या कारखान्यातील ओमकार पोटे (२४) या कर्मचाऱ्याचेच असल्याचे गुरुवारी उघडकीस आले. बोटाबाबतचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा (फॉरेन्सिक लॅब) डीएनए अहवाल गुरुवारी मालाड पोलिसांकडे आला. त्यानुसार ते बोट कंपनीच्या साताऱ्यात राहणाऱ्या कर्मचाऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले. आइस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी तपास सुरू केला.
त्यासाठी या आइस्क्रीमचा प्रवास कोठून कोठे झाला, याची पडताळणी केली. त्यानुसार हे आइस्क्रीम एक महिन्यापूर्वी इंदापूर येथील फॉर्च्यून डेअरीमध्ये तयार करण्यात आले होते. तेथून ते हडपसर येथील एका गोदामात आणि तेथून साकीनाका येथील गोदामात पाठवले गेले. पुढे भिवंडीतील गोदामातून ते मालाडला पाठविण्यात आले. डॉ. फेर्राव यांच्या बहिणीने ऑर्डर केल्यानंतर ते त्यांच्या घरी पोहोचल्याचे निष्पन्न झाले. पुणे, गाझियाबाद (उत्तर प्रदेश), अहमदाबाद (गुजरात) आणि दिल्ली या ठिकाणी मालाड पोलिसांची पथके चौकशीसाठी पाठविण्यात आली होती.
घटना काय?
डॉ. फेर्राव यांच्या बहिणीने १२ जून रोजी तीन यम्मो आइस्क्रीमची ऑनलाइन ऑर्डर केली होती. त्यांना पाठविण्यात आलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीमच्या कोनमध्ये बोटाचा तुकडा सापडला. त्यांनी इन्स्टाग्रामवर यम्मो आइस्क्रीमच्या कस्टमर केअरवर तक्रार केली. कंपनीने चौकशीचे आश्वासन दिले. मात्र, नंतर काहीच उत्तर न आल्याने डॉक्टरांनी १३ जून रोजी मालाड पोलिसात तक्रार केली.
बोटाच्या मागावर...
- तपासादरम्यान पुण्यातील इंदापूर तालुक्यातील आइस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यातील कामगार ओमकार पोटेला दुखापत झाल्याचे पोलिसांना समजले.
- त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल गुरुवारी आला.
- अहवालानुसार ते बोट कंपनी कामगार ओमकार पोटे याचेच असल्याचे स्पष्ट झाले. आता त्यांची चौकशी होणार आहे.
- या प्रकारास जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.