मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडीची दुर्घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील महाकाली रोड आणि गुरुनानक रोड येथील रामबाग सोसायटी या सात मजली इमारतीनजीक दरड कोसळून इमारतीला मोठा धोका पोहोचला. मातीचा खच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरला. इमारतीतील ११ घरांचे मोठे नुकसान झाले. यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेनंतर इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली.
या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भीमेश मुतुला यांनी दिली.
या दुर्घटनेत येथील बी इमारतीचे पहिल्या मजल्यावर सहा, दुसऱ्या मजल्यावर चार आणि तळमजल्यावर एक अशा खोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरांमध्ये रामबाग डोंगराळ भागातून माती आणि मोठे आले असून घरात मलबाचा खच पडला होता. तसेच एसआरएच्या सात मजली इमारतीमध्ये एकूण १६८ खोल्या आहेत. येथील इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांना सध्या पीएपीच्या सातव्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे.
या इमारतीच्या मागील बाजूस डोंगर असून बिल्डरने केवळ तीन फूटांचे अंतर ठेवले आहे. याठिकाणी रुग्णवाहिका जायला जागा नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच रहिवाशांना सावध करत बचावकार्य हाती घेतले.