तलाव म्हणायचे की कचराकुंडी, तुम्हीच सांगा; गणेशोत्सवापूर्वी स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:31 PM2023-08-25T14:31:28+5:302023-08-25T14:31:38+5:30
नागरिकांची जास्त वर्दळ नसल्यामुळे आरे कॉलनीतील तलाव त्यामानाने स्वच्छ आहे, पण...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेने पावसाळ्यात जीवितहानी होऊ नये म्हणून पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेतील भुजाली तलाव, अंधेरी - विक्रोळी जोड रस्त्यावर असलेला जोगेश्वरी पूर्वेकडील तलाव, आरे तलाव असे विविध तलाव तात्पुरते बंद करून ठेवले आहेत. तलावांजवळ निर्माल्य कलश नागरिकांच्या सोयीसाठी ठेवले आहेत. परंतु, बहुतेक सर्व कलश खराब अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ते कचऱ्याने भरून गेले आहेत, काही कलश फुटलेले आहेत. शिवाय मुख्य तलाव तात्पुरता बंद ठेवल्यामुळे लोक त्यांचा उपयोग कचराकुंडीसारखा करताना दिसतात.
नागरिकांची जास्त वर्दळ नसल्यामुळे आरे कॉलनीतील तलाव त्यामानाने स्वच्छ आहे. यंदा तर या तलावात गणेश विसर्जनावर बंदीच आहे. मुंबई मनपा गणेश विसर्जनासाठी दरवर्षी १५० ते १६० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देते.
कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडीतील तलावाने तर अत्यंत गलिच्छ कचराकुंडीचे रुप धारण केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तलावाचे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे काही नागरिक निर्माल्य, श्राध्द केल्यानंतरची पाण्यात विसर्जित करण्याची सामग्री आणि हाताला मिळेल ते साहित्य तलावात बाहेरूनच फेकतात. या तलावाजवळ एक रक्षक तैनात आहे. मात्र, काही जण कारने येऊन तलावात निर्माल्याच्या नावाखाली कचरा सर्रास फेकतात आणि निघून जातात. अशा लोकांना जागीच दंड आकारला पाहिजे. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे श्री गणेशाच्या आगमनापूर्वी सर्वच गणेश विसर्जन तलाव स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.
-राजू वेर्णेकर, स्थानिक
जीवित हानी होऊ नये म्हणून पावसाळ्यात सर्व तलाव बंद ठेवले आहेत. मात्र, मुंबई पालिकेला गणेश चतुर्थीपूर्वी सर्व तलाव खुले करून ते स्वच्छ करावेच लागतील. निर्माल्य पाण्यात विसर्जन करायच्या नावाखाली नागरिकांनी परिसर घाणेरडा करू नये. शेवटी निर्माल्य पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण वाढतेच. यावर उपाय म्हणजे जमलेल्या निर्माल्याची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
- ॲड. प्रतीभा गिरकर, माजी नगरसेविका