Join us

अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपसभापतीं बरोबर झाली सकारात्मक बैठक

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 5, 2023 18:12 IST

अनुसूचित जमाती आदेश क्र. १०८/१९७६ मधील अ. क्र. २८,२९,३० कोळी महादेव, कोळी मल्हार, या जमाती ह्या कोळी जेनेरिक टर्म चे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निगर्गमित व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री महोदय व अधिकाऱ्यांसमवेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याबाबत आज भाजपाचे विधानपरिषद आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी ॲड. चेतन पाटील, लक्ष्मण शिंगोरे, महादेव व्हणकाळी, गजानन पेटे मनिषा व्हणकाळी उपस्थित होते.

या निवेदनात नमूद केल्यानुसार, अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता वरिष्ठ पातळीवर एक समिती गठित करण्यात यावी. तसेच अदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनुसूचित क्षेत्रातील बांधवांप्रमाणेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासी बांधवांना देखील मिळावा. सर्व आदिवासी बांधवांची जातीय जनगणना करण्यात यावी. तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता रक्तसंबंधातील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरून इतर कागदपत्रांची मागणी न करता यामध्ये सहजता यावी. या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागाचे मंत्री महोदय व अधिकारी यांच्या सोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती आमदार रमेश पाटील यांनी केली.

अनुसूचित जमाती आदेश क्र. १०८/१९७६ मधील अ. क्र. २८,२९,३० कोळी महादेव, कोळी मल्हार, या जमाती ह्या कोळी जेनेरिक टर्म चे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निगर्गमित व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह संबंधीत विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी यांच्याकडे याविषयाबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तसेच याबाबत लवकरच विधानभवनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :मुंबई