धक्कादायक! नशेसाठी पोटच्या मुलाला ६०, तर नवजात मुलीला १४ हजारांत विकले

By मनीषा म्हात्रे | Published: November 24, 2023 08:10 AM2023-11-24T08:10:56+5:302023-11-24T08:11:53+5:30

शब्बीर आणि सानिया खान असे या दाम्पत्याचे नाव आहे.

A pregnant child was sold for 60,000 and a newborn girl for 14,000 for intoxication in mumbai by parents | धक्कादायक! नशेसाठी पोटच्या मुलाला ६०, तर नवजात मुलीला १४ हजारांत विकले

धक्कादायक! नशेसाठी पोटच्या मुलाला ६०, तर नवजात मुलीला १४ हजारांत विकले

मनीषा म्हात्रे 

मुंबई : अमली पदार्थांची सवय माणसाला केवळ जीवनाच्या खोल गर्तेकडेच नेते असे नाही तर माणुसकीही विसरायला लावते. या पदार्थांच्या आहारी गेलेले नशेसाठी आपले सर्वस्वही द्यायला तयार असतात. अगदी माया-ममताही विसरतात. असाच एक हृदयद्रावक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. केवळ नशा करता यावी यासाठी एका दाम्पत्याने पोटच्या मुलाला ६० हजार तर नवजात मुलीला १४ हजार रुपयांना विकले. 

शब्बीर आणि सानिया खान असे या दाम्पत्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने नवजात मुलीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. वांद्रे परिसरात राहणाऱ्या रुबिना खान (३२) यांच्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबिना यांचा भाऊ शब्बीर हा लग्नानंतर त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास आला. शब्बीर आणि सानिया हे दोघेही ड्रग्जच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडायचे. अखेर सानिया घर सोडून वर्सोव्यात माहेरी राहण्यास गेली. २०१९ मध्ये त्यांना सुभान नावाचा एक मुलगा झाला. सानियाच्या आईच्या निधनानंतर दोघेही नालासोपारा येथे भाड्याने राहायला गेले. त्या ठिकाणी त्यांना २०२१ मध्ये हुसेन नावाचा मुलगा झाला आणि १ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलगी झाली.     

पैशांची अडचण भासू लागल्याने ते दोघे बुधवारी रुबिनाच्या घरी राहण्यास आले. यावेळी शब्बीरसोबत फक्त चार वर्षांचा सुभान असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी अन्य मुले कुठे आहेत,  याबाबत चौकशी केली. सानियाने उत्तर देणे टाळले. अखेर, त्यांनी सानियाला विश्वासात घेत चौकशी करताच सानियाने पापाची कबुली दिली. दोघांना ड्रग्जचे व्यसन होते. याच नशेसाठी पैसे पुरत नसल्याने त्यांनी  हुसेन याला दीड वर्षांपूर्वी आणि नवजात मुलीला जन्मताच १ ऑक्टोबर रोजी विकल्याचे सांगितले. हे ऐकून रुबिना यांना धक्का बसला. 

याप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया सुरू आहे. मुलीचा शोध घेण्यात आला असून मुलाचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा याप्रकरणी सखोल चौकशी करत आहे.
-  राज तिलक रौशन, पोलिस उपायुक्त (प्रकटीकरण १) 

 जावेच्या मदतीने विक्री 
सानियाने मोठ्या बहिणीची जाव उषा राठोड हिच्या मदतीने अंधेरी परिसरातील अज्ञात व्यक्तीला ६० हजार रुपयांना मुलगा हुसेनला आणि नवजात मुलीला डी. एन. नगरमध्ये डोंगर परिसरात राहणाऱ्या शकील मकराणी याला १४ हजार रुपयांना विकले. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. 

मोठे रॅकेट असल्याची शक्यता 
nमुले खरेदी-विक्री करणारी एक टोळी शहरात कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष नऊचे प्रमुख दया नायक यांना मिळाली. 
nत्यानुसार त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असताना डी. एन. नगर परिसरामध्ये एका मुलीसोबत एका महिलेला पाहिल्याचे समजले.
nत्यानंतर नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत नवजात बाळाची सुखरूप सुटका केली. तर एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.  

Web Title: A pregnant child was sold for 60,000 and a newborn girl for 14,000 for intoxication in mumbai by parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.