मुंबई -
मुंबई विमानतळावर सांयकाळी पाचच्या सुमारास उतरू पाहणारे एक छोटेखानी चार्टर विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर तातडीने मुंबई विमानतळावर तैनात अग्निशामक दलाच्या गाड्या व अॅम्बुलन्स यांनी घटनास्थळी धाव घेतली. विमानात दोन क्रू मेंबर आणि सहा प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे विमान विशाखापट्टणम येथून येत होते. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर लँड होताना अपघात घडला आहे. खराब हवामानामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील सर्व विमान वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याचे नियोजन असलेल्या सर्व विमानांना अन्य विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आल्याची माहिती आहे.