Join us

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सव्वा कोटी भाडे; अंबरनाथ येथे १० इमारती घेणार भाड्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 9:37 AM

महाविद्यालय सुरू करण्यासाठी इमारतीच नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तेथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी इमारतीच नसल्यामुळे १० इमारती या भाड्याने घेण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, या इमारतींच्या भाड्याच्या खर्चासाठी वर्षाकाठी १ कोटी २५ लाख ७६ हजार ४८० रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.

अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाने बदलापूर पश्चिम विभागात मौजे सोनिवली येथे बीएसयूपी योजनेअंतर्गत बांधलेल्या इमारत क्रमांक २१ ते ३० अशा १० इमारतींसाठी (प्रति इमारत क्षेत्रफळ ५८३.३ चौरस मीटर) सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून निश्चित केलेल्या प्रतिमाह १०, ४८, ४० प्रमाणे एकूण १ कोटी २५ लाख ७६ हजार ४८० रुपये इतके वार्षिक भाडे खर्चासाठी विभागाने मान्यता दिली आहे. 

४३० खाटांचे रुग्णालय

हा भाडेकरार इमारत उपलब्ध करून दिलेल्या दिनांकापासून अंमलात येईल. त्याची मुदत ३ वर्षे असेल. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे जोपर्यंत इमारत उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिली जाईल. येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

विविध कारणांमुळे परवानगी नाकारली

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार १० नवीन महाविद्यालयांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्जही केला आहे. मात्र, गेल्या महिन्यात दहापैकी मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे (जीटी महाविद्यालयास) महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. अन्य ९ महाविद्यालयांची परवानगी पायाभूत सुविधा, अपुरा अध्यापक वर्ग या तसेच विविध कारणांमुळे नाकारली होती.

टॅग्स :वैद्यकीय